नाशिक – बेकायदेशीर बाबीचे पितळ केव्हा ना केव्हा उघड पडतेच हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात झालेला एक बेकायदेशीर बालविवाह उघड झाला आहे. विशेष म्हणजे, गरम पाणी अंगावर पडल्याने नववधू भाजली आणि बालविवाहाचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईसह पती आणि सासरच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी करंजवणचे ग्रामविकास अधिकारी अरूण आहेर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार किरण संजय बिडवे, संजय बिडवे, संगीता बिडवे (सर्व रा. खंबाळेवाडी – घोटी, ता. इगतपुरी) व मुलीची आई ज्योती पितांबर जाधव (रा.जळगाव हल्ली लखमापूर फाटा ता.दिंडोरी) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जखमी नववधूचा पोलीस आणि बालकल्याण समितीने घेतलेल्या जबाबावरून हा प्रकार समोर आला असून करंजवण येथील सुदाम शंकर पंडित यांच्या घराच्या पडवीत गेल्या २ मे रोजी हा विवाह पार पडला होता. लॉकडाऊनमुळे सर्वत्र संचारबंदी असतांना रेणूका या तेरा वर्ष ३ महिने वयाच्या मुलीशी किरण बिडवे या युवकाचा विवाह लावून देण्यात आला होता. त्यानंतर बिडवे कुटूंबिय आपल्या सुनेस सोबत घेवून खंबाळेवाडी येथे रवाना झाले होते. साडे सहा महिन्यानंतर संजय बिडवे यांचे सासरे सुदाम पंडित यांचा मृत्यु झाल्याने २४ नोव्हेंबर रोजी बिडवे कुटूंबिय पुन्हा करंजवण येथे दाखल झाले असता ही घटना घडली.
पहाटेच्या सुमारास गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने नववधू गायत्री उर्फ रेणुका किरण बिडवे व तिची ननंद प्रतीक्षा बिडवे या नणंद भावजय भाजल्या गेल्याने या बालविवाहाचा भांडाफोड झाला. दोघींच्या अंगाखाली गरम पाणी गेल्याने त्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस आणि बाल कल्याण समिती नाशिक यांनी घेतलेल्या जाब जबाबावरून हा प्रकार समोर आला आहे. रेणूका हिने आपल्या जबाबात ७ वी पर्यंत शिकल्याचा तसेच १४ वर्ष वय असल्याचा उल्लेख केल्याने पोलीसांनी या घटनेचा उलगडा केला आहे. रेणुका हिचा बालविवाह झाल्याचा संशय आल्याने पोलीसानी ग्रामविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती मुलगी रेणुका हिचा बालविवाह किरण संजय बिडवे याच्याशी चोरून झाल्याचे समोर आले आहे. संशयीतां विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक स्वप्निल राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रतन पगार जमादार आर व्ही सोनवणे तपास करीत आहेत.