नवभारताचे आद्यप्रबोधनकार राजा राममोहन रॉय यांची आज दि. २७ सप्टेंबर रोजी पुण्यतिथी, त्यानिमित्त विशेष लेख…
– मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी ही घटना आहे, इ. स. १८१२ मध्ये एका राजघराण्यातील व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याची पत्नी परंपरेनुसार सती गेली. सती जाण्याची इच्छा नसतानाही तिला जबरदस्तीने सती जाण्यास भाग पाडण्यात आले. याचा त्या कुटुंबातील एका तरुणाच्या जीवनावर खूप खोल परिणाम झाला. किती क्रुर प्रथा आहे ही, हजारो वर्षापासून चालत आलेली ही प्रथा नष्ट झाली पाहीजे, असा विचार करीत तो तरूण सुमारे वर्षभर दुःखाने व्याकूळ झाला. त्यानंतर या तरूणाने सती जाण्याच्या अनिष्ट प्रथेविरूद्ध आवाज उठविला, कोण होता तो तरूण? तो तरूण म्हणजेच राजा राममोहन रॉय होत.
आपल्या भावाचीच पत्नी सती गेल्याने ते खूप दुःखी झाले. आणि या अनिष्ट प्रथेतून मार्ग काढण्यासाठी समाजप्रबोधनाचा निर्णय घेतला. एखादी स्त्री सती जाण्यासाठी निघाली आणि तिला यासाठी प्रवृत्त करणारी कुटुंबे दिसली की राजा राममोहन रॉय यांना स्वतः स्मशानात जाऊन विरोध करत असत. तात्कालीन समाजात सती जाण्याचे प्रमाण प्रचंड होते. पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्री पुढे दोनच पर्याय असत. एक म्हणजे सर्व सुखाचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांचे पालन करीत जीवन जगणे आणि दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे होय. त्या काळी एखाद्या स्त्रीने सती जाण्याचा निर्णय घेतला तर तिला त्यापासून परत फिरता येत नसे. खरे म्हणजे त्या स्त्रीला सती जाण्याचा निर्णय घेण्यासाठी तिच्या कुटुंबीयांकडूनच प्रवृत्त केले जात असेे. भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीने सती जाण्याचा निर्णय घेऊन परत फिरायचा प्रयत्न केला, तर तिला मोठ्या बांबूच्या साह्याने पतीच्या चितेवर ढकलण्यात येत असे. तसेच तिचा आक्रोश कोणाला ऐकू येऊ नये, म्हणून मोठमोठी वाद्य वाजवली जात. काही वेळा तर तिला पतीच्या प्रेताला बांधून जिवंत जाळण्यात येत होते. आपली वहिनी सती गेल्यानंतर राजा राममोहन रॉय प्रचंड व्यथित झाले. सती प्रथेविरुद्ध मोहीम उघडल्याने राजा राममोहन रॉय व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाला यश येऊन दि. १६ जानेवारी १८३० रोजी भारतात सती प्रथाबंदीचा कायदा संमत करण्यात आला. या कायद्याचे जनक म्हणून राजा राममोहन रॉय यांचे नाव घेतले जाते.
राजा राममोहन रॉय यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्यातील (पूर्वीचे बरद्वान) राधानगर या खेड्यात दि. २२ मे १७७२ रोजी झाला. त्यांचे पिता रमाकांत रॉय हे परंपरावादी आणि हिंदू धर्मशास्त्राचे पालन करणारे गृहस्थ होते. तर माता तारिणी देवी ही कुशाग्र बुद्धीची आणि धर्मपरायण स्त्री होती. राजा राममोहन रॉय यांचे पणजोबा कृष्णचंद्र बॅनर्जी बंगालचा नबाब सिराज उद्दौला यांच्या सेवेत होते. त्यांच्या कार्यावर खुश होऊन नबाबने त्यांना राय-राया हा किताब दिला होता. त्यामुळे कालांतराने त्याच्या परिवाराचे बॅनर्जी आडनाव मागे पडून रॉय हे नाव प्रसिद्धीस आले. मात्र खुद्द राजा राममोहन रॉय यांना दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर यांनी राजा हा किताब दिला होता. त्यामुळे त्यांचे नाव राजा राममोहन रॉय असे झाले. राजा राममोहन राय बालपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते . त्यांचे प्राथमिक शिक्षण पारंपरिक वेदपाठशाळेत झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण वाराणसी येथे घेतले. तेथे त्यांनी सर्व धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. वयाच्या सोळाव्या वर्षी ते आपल्या गावी परतले . त्यानंतर रॉय यांनी महसूल खात्यात वसुली अधिकारी म्हणून नोकरी पत्करली . पुढे अनेक धर्मग्रंथाचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला.
भारत देशाच्या इतिहासाचे ढोबळमानाने तीन भाग पडतात, प्राचीन, अर्वाचीन आणि आधुनिक . त्यापैकी आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात ज्या समाज सुधारक महापुरुषापासून होते ते नाव म्हणजे राजा राममोहन रॉय. किंबहुना नवभारताचे आद्य प्रबोधनकार म्हणून त्यांना संपूर्ण जग ओळखते . जुनाट रूढी परंपरांच्या गर्तेत असलेल्या समाजाला नव्या आचार विचारांची दिशा आणि दृष्टिकोन देण्याचे कार्य राजा राममोहन रॉय यांनी केले. त्यानंतर सर्व सामाजिक, राजकीय सुधारकांचे गुरू आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. इंग्रजांच्या आगमनानंतर भारतभर नवप्रबोधनाचे वारे वाहत असताना वेगवेगळे समाज, सभा, मंडळ स्थापन करण्याचे कार्य सुरू झाले . या प्रबोधनात्मक कार्याची पहिली नांदी ही बंगालमध्ये ब्राह्मो समाजाच्या स्थापनेने झाली, असे म्हटले जाते . त्यानंतर अन्य राज्यात प्रार्थनासमाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन अशा शेकडो समाज संस्था स्थापन झाल्या.
कलकत्ता येथे रॉय यांनी महाराजा द्वारकानाथ ठाकूर (टागोर), कालीनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या सहकार्याने २० ऑगस्ट १८२८ रोजी ब्राह्मो सभेची स्थापना केली . या सभेलाच पुढे ब्राह्मोसमाज असे म्हणण्यात येऊ लागले . काही दिवसात प्रसन्नकुमार ठाकूर , चंद्रशेखर देव, रामचंद्र विद्यावागीश आदी सहकारी ब्राह्मो समाजाच्या कार्यात सहभागी झाले. हळूहळू सभेच्या सदस्यांची संख्या वाढू लागली . या समाजाच्या मूलभूत सिद्धांतांना अंतःप्रेरणा आणि निसर्गाचे अवलोकन ही दोन प्रमाणे होती. तसेच कोणताही ग्रंथ, धर्मग्रंथ पूर्ण मानता येत नाही, असे विचार या समाजाचे होते. सार्वत्रिक धर्म निर्माण करणे हेच या समाजाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते.
राजा राममोहन रॉय व त्यांचे सहकारी केवळ सामाजिक-धार्मिक सुधारणांबाबत आग्रही नव्हते , तर आपल्या भारतीय समाज बांधवांना आर्थिक दुर्दशेतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल? यासाठी ते नेहमी विचार मंथन करीत . तसेच वेगवेगळ्या माध्यमातून आपले आर्थिक सुधारणावादी विचार मांडत इ. स. १८३२ मध्ये पार्लमेंट समितीपुढे भाषण करताना रॉय यांनी जमीन कसणारा शेतकरीवर्ग फार हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे, सर्व गरीब लोक जमीनदारांच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडत आहेत, असे सांगितले. तसेच त्यासाठी जमीनदारांकडून भूमिहीन, अल्पभूधारकांचे चाललेले शोषण थांबावे म्हणून जिल्हा कलेक्टर नेमावे , अशी त्यांनी मागणी केली.
राजा राममोहन रॉय यांच्या अंगी बुद्धिप्रामाण्यवाद , परोपकार आणि निखळ सत्यनिष्ठा हे गुण होते. त्यांचे संस्कृत, हिंदी, बंगाली, इंग्रजी भाषेवर वर्चस्व होते. या शिवाय लॅटिन, ग्रीक, हिब्रू भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांनी संक्षिप्त वेदांत (वेदान्तसार) या संस्कृत ग्रंथाचे बंगाली, हिंदी व इंग्रजी भाषेत भाषांतर केले. तद्वतच नवविचार प्रणालीला चालना देणारे सार्वत्रिक धर्म नामक पुस्तक लिहिले. हिंदू कॉलेजच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. त्यांनी इ. स. 1826 मध्ये वेदांत महाविद्यालयाची स्थापना केली. येथे काही काळ ते संस्कृत देखील शिकवत असत. राजा राममोहन रॉय यांच्या सुधारणावादी कार्यासाठी समाजप्रबोधन व्हावे म्हणून वृत्तपत्र हे माध्यम उपयुक्त ठरेल असे विचार त्यांनी व्यक्त केले आणि त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या. त्यांच्या प्रयत्नातूनच 1816 मध्ये कलकत्ता येथे बंगाल गॅझेट हे बंगाली भाषेतील आणि देशातील पहिले उदारमतवादी साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू झाले. ‘संवाद कौमुदी’ या बंगाली भाषेतील साप्ताहिकाचे ते संपादक देखील होते. राममोहन हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे अग्रदूत आणि जनक आहेत. दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर यांच्या काही तक्रारी घेऊन 19 नोव्हेंबर 1830 रोजी राममोहन इंग्लंडला रवाना झाले. तेथे त्यांनी राजदरबारी व पार्लमेंट मंडळापुढे भारताची बाजू मांडली. त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार व गौरव झाला. दरम्यान युरोप दौऱ्यात राममोहन यांची प्रकृती खालावली. वास्तविक त्यांची प्रकृति दणकट होती. अतिपरिश्रमाने ते आजारी पडले. अखेर 27 सप्टेंबर 1833 रोजी राममोहन ब्रिटनला असताना अनंतात विलीन झाले.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)