नाशिक – महापालिकेच्या पंचवटी पाणीपट्टी विभागात कार्यरत असलेला कनिष्ट लिपिक संजय वनारसीभाई पटेल यास तब्बल १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे.
पटेल याने पंचवटीतील एका फ्लॅटला नवीन पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी तब्बल ३५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती १६ हजार रुपयात हे काम करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी ६ हजार रुपये आधी स्विकारण्यात आले आणि १० हजार रुपये नंतर देण्याचे निश्चित झाले. यासंदर्भात एसीबीकडे तत्काळ तक्रार करण्यात आली. एसीबीने सापळा रचला. त्यात पटेल हा अडकला. दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने पटेलला पकडले. याप्रकरणी पटेल विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पटेल हा आमदार देवयानी फरांदे यांचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.