नाशिक – नरेडको नाशिकतर्फे नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, सहसंचालक नगररचना प्रतिभा भदाणे आणि सहसंचालक ‘एनएमआरडीए’ सुलेखा वैजापूरकर यांची सदिच्छा भेट घेतली. सुलेखा वैजापूरकर यांची नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण’ अर्थात ‘एनएमआरडीए’ प्राधिकरणाच्या सहसंचालकपदी नियुक्तीबाबत नरेडको नाशिक तर्फे स्वागत करण्यात आले. या अनुषंगाने नाशिकच्या विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.
महसूल आयुक्त गमे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था या शहरांच्या पालकसंस्था असतात. अशा संस्थांच्या निर्णयप्रक्रियेचा दूरगामी परिणाम संपूर्ण शहर तसेच नागरिकांवर होत असतो. दूरदृष्टी दाखवत समाजभिमुख, लोकपयोगी निर्णय घेतल्याने शहर विकासास नवीन आयाम प्राप्त झालेला आहे. शासन निर्णयानुसार विकासाची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये महानगरपालिका हद्दीच्या बाहेर दोन (२) किलोमीटर क्षेत्रापर्यंत रहिवाशी विभागाकरिता २.५ एफ.एस.आय. व हरित/नाविकास विभागात १ एफ.एस.आय. प्रस्तावित करण्यात आला आहे, नाशिक महापालिका हद्दीच्या बाहेर योजना प्रस्तावित असल्याने यामध्ये कुठलेही प्रीमियम शुल्क लागणार नाही. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत गट (EWS) व कमी उत्पन्न गट (LIG) नागरिकांसाठी सदनिका उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. सदर शासन निर्णय नागरिकांच्या सूचना व हरकती यास्तव निर्देशित असून २ ऑक्टोबर पर्यंत सहसंचालक, नगररचना, नाशिकरॊड यांचेकडे सूचना व हरकती दाखल करता येणार आहे,असे गमे यांनी सांगितले.
नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण’ अर्थात ‘एनएमआरडीए’ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांचा विकास, विकासाचे योग्य व सूक्ष्म नियोजन आणि नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे सूतोवाच सहसंचालक भदाणे यांनी नरेडको पदाधिकाऱ्यांना सांगितले. यामुळे नाशिक महानगराच्या विकासाला वेग येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
नाशिक ‘एनएमआरडीए’ अंतर्गत या योजनेत सर्व घटकांना यामध्ये विकासाच्या दर्जेदार संधी असून सर्वांनी याकडे डोळसपणे बघण्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन ‘एनएमआरडीए’ प्राधिकरणाच्या सहसंचालक वैजापूरकर यांनी सांगितले. या भेटीप्रसंगी नरेडकोचे अभय तातेड, सुनील गवादे, जयेश ठक्कर, सुनील भायभंग, भाविक ठक्कर आदी उपस्थित होते.