मुंबई – राज्यभरात कोरोनाचा फैलाव वाढत असून अनेक राजकीय नेत्यांसह मान्यवर व्यक्तींना कोरोनाची लागण होत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांच्या मातोश्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना मुंबईतील गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विशेष फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. कोरोनाची लागण झाल्याने रश्मी ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे यांनीही कोरोना लस घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्याचसोबत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गेले आठ दिवस त्यांना खोकला येत होता. त्यामुळे त्यांना मंगळवारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला वर्षा निवासस्थानी क्वारन्टाइन राहिल्यानंतर रश्मी ठाकरे यांना अधिक उपचारांसाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात ३९ हजार ५५४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे.