नाशिक – दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीची उपनदी असलेल्या नंदिनी (नासर्डी) नदीची अवस्था अत्यंत वाईट असून तातडीने नमामी नंदिनी प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात मात्र, नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने असमर्थता दर्शविली आहे.
गोदा संवर्धन मोहिमेचे सदस्य आणि निसर्गसेवक युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी स्मार्ट सिटीला पत्र दिले होते. त्यात म्हटले होते की, नाशिक शहरातील मुख्य उपनद्यांपैकी एक असलेल्या नंदिनी (नासर्डी) नदीसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत “नमामि नंदिनी” हा प्रकल्प राबविण्यात यावा. नंदिनी (नासर्डी) नदीचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी स्मार्ट सिटी कंपनीकडे करण्यात आली. त्याची दखल घेऊन कंपनीने कुलकर्णी यांना पत्र पाठविले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, नाशिक महापालिका स्मार्ट सिटी अंतर्गत मंजुरी प्राप्त असलेल्या प्रकल्पाच्या यादीत आपण सुचविलेल्या नदीचा समावेश नाही. म्हणून सदर प्रकल्पाचे काम नाशिक स्मार्ट सिटी मार्फत करणे शक्य नाही.
याप्रकरणी कुलकर्णी नाराजी व्यक्त केली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत पंचवटीत अनेक कामे केली जाणार आहेत. तसेच, गोदावरी नदीसाठी अनेक उपाययोजना प्रस्तावित आहेत. मात्र, जर उपनद्या स्वच्छ राहिल्या नाही तर गोदावरी कशी प्रदूषण मुक्त राहिल, असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. नाशिक शहर खरोखरच स्मार्ट करायचे असेल तर सुरुवात नदी, नाले यांच्यापासून करायला हवी. शहरातील नद्या स्वच्छ आणि समृद्ध करायला हव्यात, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच स्मार्ट सिटी नाशिक मध्ये सभासद असलेल्या स्थानिक आमदार, नगरसेवक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.