मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातल्या आदर्श गावामंधली बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा मोडीत निघाली आहे. जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या गावात अनेक वर्षांनी ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष निवडणुका होणार आहेत.
आदर्श गाव ठरलेलेल्या हिवरे बाजारातून पोपटराव पवार सातव्यांदा निवणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले होते. मात्र या आवाहनावर एकमत होऊ शकले नाही.
वाशीम जिल्ह्यात मात्र ९ ग्रामपंचायतींमधल्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली. यात वाशीम तालूक्यातल्या ४, मालेगाव तालुक्यातल्या २, तर मनोरा, कारंजा आणि रिसोड तालुक्यातल्या प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उरलेल्या १५४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल.
धुळे जिल्ह्यातही ३५ ग्रामपंचायतींमधे बिनविरोध निवडी झाल्या. यात शिंदखेडा तालुक्यातल्या १५, साक्री तालुक्यातल्या ९, शिरपूर तालुक्यातल्या ६ तर धुळे तालुक्यातल्या ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामुळे आता उरलेल्या १८३ ग्रामपंचायतीसाठी मतदान होईल.
अकोला जिल्ह्यातल्या २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १ हजार ३१६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता या ग्रामपंचायतीतल्या २ हजार ७० जागांसाठी ४ हजार ७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.