त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर नगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील दिलीप शेलार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी त्यांना अपात्र ठरविल्याचा निकाल दिला होता. मात्र, या निर्णयास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निर्णयास स्थगिती दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करीत भगवती चौकात आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला.
येथील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत पाठक यांनी स्वप्नील शेलार हे नगर पालिकेचे लाभार्थी असल्याचे व त्यांनी माहिती दडवून ठेवल्याचा अर्ज मागच्या महिन्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे करत अपात्रतेची मागणी केली होती. नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी डिसेंबर २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपा चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय मिळाला होता. त्यांनी काही वर्षांपासून नगर पालिकेच्या मालकीची असलेली शिवनेरी धर्मशाळा ठेकेदारी पध्दतीने चालवायला घेतलेली होती. सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा व त्यानंतर देखील धर्मशाळेचा ठेका त्यांच्या नावावर होता. याची माहिती चंद्रकांत गणपतराव पाठक यांनी मिळवली आणि अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन मंगळवारी आदेश प्राप्त झाला. चंद्रकांत पाठक यांनी सर्व १८ नगरसेवक यांना अतिक्रमणाच्या मुद्यावर अपात्र ठरवावे असा दुसरा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेला आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. मात्र, पहिल्या प्रकरणातच त्यांच्यावर अपात्रतेचा निकाल देण्यात आला. त्यास आता नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.
प्रभाग क्रमांक ५ सह शहरातील नागरिकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळेस नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, बाळासाहेब पाचोरकर, उल्हास उगले आदींसह नागरीक उपस्थित होते. शेलार हे कोरोना लॉकडाऊन काळात सेवा संघ संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मदत करीत आहेत.
—
हा सत्याचा विजय आहे. मी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पदाचा वापर करत कोणताही लाभ घेतलेला नाही.
– स्वप्नील शेलार