ठाणे – राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून केले जात आहे. तरीही अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतरही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडूनच नियम पाळले जात नसल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाकडून त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
कल्याण पश्चिमच्या चिकणघर परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले, शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात एकच गर्दी झाली. गर्दीत सोशल डिस्टन्सिंग नव्हेच. मास्कचा कोणीही वापर करताना दिसले नाही. विशेष म्हणजे लग्नसोहळ्यात वेळेच्या मर्यादेचेही उल्लंघन करण्यात आले आहे.
डोंबिवलीत आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी मागे गुन्हा दाखल केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगूनही त्यांचे पदाधिकारी नियम पाळणार नसतील तर ते काय सांगणार आहेत, असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. या लग्नसोहळ्यात अनेक नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती.