दिंडोरी – दिंडोरी नगरपंचायतीसह जिल्हयातील नगरपंचायतीच्या चतुर्थ श्रेणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक आयोजित करुन नगरपचायत कर्मचार्यांचे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी दिले.
नाशिक येथे नगरपंचायत कर्मचार्याच्या प्रश्नाबाबत आ. डॉ.तांबे यांनी आढावा घेतला. यावेळी नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे विभागाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, जिल्हाध्यक्ष भारत कापसे, विजय केदारे यांनी भाग घेतला. नगरपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतीत असल्यापासून ते आता नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतरही काम करीत आहे. त्यांना त्यांच्या हक्काचे दाम मिळत नाही व सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सुविधाही मिळत नाही. नगरपंचायत कर्मचार्यांचे भवितव्य अंधारात असून त्यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी भारत कापसे यांनी केली. शासनाने जो आकृतीबंध नवनिर्मित नगरपंचायत कर्मचार्यांसाठी केला आहे. तो रदद करुन नव्याने आकृतीबंध तयार करावा. सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांना सेवेत समावेश करुन घ्यावा,समान कामाला समान वेतन मिळावे,नगरपंचायत अर्थ संकल्पात सर्व कर्मचार्यांना बोनसची तरदुत करावी आदी मागण्या राजेंद्र शिंदे, भारत कापसे,विजय केदारे यांनी केल्या. कोरोना काळात नगरपंचायत कर्मचार्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा केली. दिंडोरी शहरात सर्व जबाबदार्या पार पाडल्याने त्यांचा समावेश तातडीने कायमस्वरुपी सेवेत करावा, अशी मागणी नितीन गांगुर्डे यांनी केली. आ.डॉ.तांबे यांनी कर्मचार्यांच्या मागण्यावर सखोल चर्चा केली व याबाबत नगररचना मंत्री,त्यांचे सचिव यांच्याशी चर्चा करुन मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.यावेळी कॉग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल आव्हाड यांनीही चर्चेत सहभाग घेतला.यावेळी अनिल गायकवाड,सुरेश अहिरे,गोविंद गाढवे,विक्रम निकम आदी उपस्थित होते.