बिजापूर (छत्तीसगढ) – जिल्ह्यात माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत तब्बल २२ सुरक्षा जवान शहीद झाले असून २४ जवान जखमी झाले आहेत. बस्तर भागात काही माओवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानं सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी ही चकमक झाली.
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर शनिवारी दुपारी गोळीबार सुरु केल्यानं चकमकीला तोंड फुटलं. घटनास्थळी दोन हेलिकॉप्टर्स आणि नऊ रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. या चकमकीत २२ सुरक्षा जवान शहीद झाल्याचे बिजापूरचे पोलिस अधिक्षक कमलोचन कश्यप यांनी दिली आहे. तब्बल तीन तासापेक्षा अधिक काळ दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू होता.
नक्षलवाद्यांची माहिती मिळताच बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यात केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाची कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफ या तिघांनी संयुक्तरित्या नक्षलवादा विरोधातील मोहिम हाती घेतली होती.
केंद्र सरकारनेही या घटनेची दखल घेतली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संपर्क केला आहे. या हल्ल्याचा निषेध करीत नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे शहा यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. नक्षलवादाने पुन्हा एकदा तोंड वर काढल्याचे दिसत आहे. चकमक थांबली असली तरी शोध व बचावकार्य अद्याप सुरूच असल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1378603451223957506