नवी दिल्ली – छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात २२ जवान शहीद झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय अॅक्शन मोड आले असून, नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध आता निर्णायक युद्ध करण्याच्या रणनीतीवर काम सुरू झाले आहे. घनदाट जंगलातील नक्षलवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करून त्यांची संघटना संपवणे असा या ऑपरेशनचा उद्देश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील रणनीतीबाबत चर्चा केली.
आर-पारच्या लढाईचे संकेत
आसाममध्ये अंतिम टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचार मध्येच सोडून आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी आता नक्षलवाद्यांविरोधातील लढाई अधिक कठोरतेने लढणार असल्याचे सांगितले. सहा एप्रिलला आसाम, तामिळनाडू आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर अतिरिक्त केंद्रीय दलांना छत्तीसगडमध्ये पाठवले जाऊ शकते, असे मानले जात आहे. नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन सुरू करण्याचे संकेत वरिष्ठ अधिकार्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांना मदतीचे आश्वासन
नक्षलवादी हल्ल्यात जवान शहीद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अमित शाह यांनी लगेचच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक कुलदीप सिंह यांना तत्काळ छत्तीसगडमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शाह त्वरित दिल्लीत
आसाममध्ये रविवारी (४ एप्रिल) तिसर्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने अमित शाह यांच्या तीन प्रचारसभा होणार होत्या. त्यामध्ये आसामचे अर्थमंत्री हिंमत बिस्व सरमा यांच्या विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेचाही समावेश होता. सरमा यांच्यासोबत जालगुडी विधानसभा मतदारसंघातील सौलकुची येथे पोहोचल्यानंतर अमित शाह यांना नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शाह काहीही न बोलता गुवाहाटी आणि नंतर दिल्लीला परतले.
उच्चस्तरीय बैठक
दिल्लीला परतल्यानंतर अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत गृहसचिव अजय भल्ला आणि गुप्तचर विभागाचे संचालक अरविंद कुमार यांच्यासह सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीबाबत तसेच नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनच्या रणनीतीबाबत बैठकीत चर्चा झाली.
कठोर कारवाई
नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या ऑपरेशनचे संकेत देत अमित शहा यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास त्यांनी जवानांचे कुटुंबीय आणि देशातील जनतेला दिला. ही लढाई सुरूच राहणार असून, शेवटच्या परिणामांपर्यत जाईल, असे ते म्हणाले.
कारवाईची तयारी
गृहमंत्रालयाकडून लवकरच नक्षलवाद्यांविरोधात नव्या रणनीतसह मोठे ऑपरेशन सुरू होणार आहे. या ऑपरेशनची तयारी आधीपासूनच सुरू होती. परंतु पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर केंद्रीय निमलष्करी जवानांना तैनात केल्यामुळे कारवाई सुरू होऊ शकली नाही, असे एका वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. सहा एप्रिलला आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये मतदान झाल्यानंतर निमलष्करी जवानांना छत्तीसगडकडे रवाना करण्यात येणार आहे.