जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश
नंदुरबार – कोविड-१९ संसर्गाबाबत दैनंदिन माहिती मिळविणे, विविध यंत्रणांमध्ये समन्वय व माहितीच्या विश्लेषणासाठी नंदुरबार व शहादा येथे नियंत्रण कक्ष स्थापित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. डॉ. भारुड म्हणाले की, नंदुरबार येथे ३, शहादा २ आणि नवापूर व तळोदासाठी प्रत्येकी १ मोबाईल टीम नियुक्त करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक नियेाजन करावे. अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन केंद्राला दररोज भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करावी. कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह स्वतंत्र खोलीत ठेवण्यात यावा व नातेवाईकांना माहिती देवून कमीत कमी वेळेत अंत्यसंस्कार करण्यात यावेत. शहादा येथे ६० आणि नंदुरबार येथे आणखी १५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. बैठकीस दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.