नंदुरबार – नंदुबार दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आढावा बैठकीनंतर कृषि विभागाच्या फळरोपवाटिकेची पाहणी केली. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पारंपरिक पद्धतीने धनुष्यबाण देऊन त्यांचे स्वागत केले. ठाकरे यांनी रोपवाटिकेबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी फळबाग लागवड महत्वाची ठरेल. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी आणखी फळबाग रोपवाटिका तयार करण्यास शासन सहकार्य करेल असे त्यांनी यावेळी सांगितले. सीडबॉल तयार करून ते अधिक पाऊस असलेल्या भागातील उजाड डोंगरावर टाकण्याचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना त्यांनी केली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी लसीकरणाबाबत दुर्गम भागातील जनतेला दिला विश्वास मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. दुर्गम भागातील माझ्या माताभगिनी आणि बांधवाना कोरोना लसीकरणाची चांगली सुविधा मिळते का हे पाहण्यासाठी मोलगी येथून लसीकरण केंद्राच्या भेटीला सुरुवात करीत आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, लस घेताना कोणतीही भीती मनात बाळगू नका. कोरोनाचे संकट वाढत असले तरी सर्वांनी निश्चय केल्यास त्यावर मात करता येईल. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन सुरू ठेवा. आपण स्वतः लस घेतली असून त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने घाबरू नका, अशा शब्दात त्यांनी लसीकारणासाठी आलेल्या नागरिकांना विश्वास दिला. श्री.ठाकरे यांनी लसीचा साठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था व शितपेटीसाठी आवश्यक विद्युत व्यवस्थेविषयी माहिती घेतली. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी पोषण पुर्नवसन केंद्राला भेट देऊन कुपोषीत बालकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात मांडण्यात आलेल्या रानभाज्यांची आणि सातपुड्यातील पारंपारिक पिकांची माहिती घेतली. त्यांनी रानभाज्या पिकविण्याऱ्या आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि पारंपरिक वाणाचे संवर्धन केल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. रानभाज्याना
बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.