नंदुरबार – नंदुरबार जिल्हा दौ-यावर आलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी धडगाव तालुक्यातील सुरवणी विद्युत उपकेंद्राच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले आणि उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. काम पूर्ण करण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, दुर्गम भागातील विजेची समस्या दूर करण्यासाठी तोरणमाळ येथील विद्युत उपकेंद्रासाठी १६ कोटींचा प्रस्ताव पाठविल्यास त्यासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
हे उपकेंद्र पुर्णत्वास आल्यास अक्राणी अक्कलकुवा व परिसरातील २०० गावे व साधारण ११ हजार ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या उपकेंद्रातून ३३ के.व्ही. दाबाने धडगांव, हातदुई, मोलगी, जमाना, काकरदा, पिंपळखुटा या गावांना विजपुरवठा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील २२० गावांना शहादा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. या उपकेंद्रामुळे ३३ के.व्ही. वाहीनीची लांबी कमी होणार असून त्यामुळे या भागातील भविष्यात येणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांचे मोलगी येथे स्वागत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी हॅलिपॅडवर आगमन झाले. आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि आरोग्य सचिव प्रदीप
व्यास होते. ॲड. पाडवी यांनी सातपुड्यातील डाब येथील स्ट्रॉबेरी मुख्यमंत्र्यांना भेट दिली. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार मंजुळा गावीत, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, माजी मंत्री पद्माकर वळवी,
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, आमश्या पाडवी आदी उपस्थित होते.