नंदुरबार : नंदुरबार जवळ कोंडाईबारी घाटातल्या दर्ग्याजवळ पुलावरून बुधवारी पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. धुळे – सुरत राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. जळगावहून सुरतकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स बस कोंडाईबारी घाटातल्या दर्ग्याजवळ पुलावरून थेट दरीत कोसळली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत कार्य करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमींना तातडीने दरीतून बाहेर काढत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात भीषण असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. नेमका अपघात कसा झाला याचाही पोलीस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही ट्रॅव्हल्स बस प्रवाशांनी भरली होती. तब्बल ४० हून अधिक जण हे गाडीमध्ये असल्याचं सांगण्यात आहे. त्यानुसार पोलीस आता अधिक तपास करत आहेत.