नंदुरबार – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात सर्व प्रकारच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक कार्यक्रम, स्पर्धा, इतर मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारे मेळावे प्रतिबंधित असतील असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, निवासी शाळा, कॉलेज, वसतीगृहे, कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्र 31 मार्चपर्यंत बंद राहतील. तथापि ऑनलाईन शिक्षणास परवानगी राहील. नंदुरबार,नवापूर, शहादा, तळोदा नगरपालिका क्षेत्रात, अक्राणी नगरपंचायत, अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात सायंकाळी 7 ते सकाळी 6 या कालावधीत कडक संचारबंदी लागू राहील. जीवनावश्यक वस्तू असलेली मार्केट, दुकाने, आस्थापना पूर्वी दिलेल्या आदेशानुसार सकाळी 6 ते सायंकाळी 7 यावेळेत सुरू रहातील.
सर्व सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू रहातील. शॉपिंग मॉलदेखील कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करून सुरू राहतील. या सर्व ठिकाणी नागरिकांना चेहऱ्यावर मास्क असल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. प्रवेशद्वाराजवळ तापमान मोजण्याचे यंत्राचा वापर करावा. संशयित नागरिकांना प्रवेश देण्यात येऊ नये. प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. शारिरीक अंतराचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
विवाह समारंभात सामाजिक अंतराचे पालन करून जास्तीत जास्त 50 व्यक्तिंना उपस्थित राहण्यास अनुमती असेल. नियमाचे उल्लंघन झाल्यास मालक व आयोजकांविरुद्ध दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अंत्यविधीस सामाजिक अंतराचे पालन करून जास्तीत जास्त 20 व्यक्तीस उपस्थित राहण्यास अनुमती असेल. याबाबत स्थानिक क्षेत्रीय अधिकारी यांनी सुनिश्चिती करावी.
आरोग्य संबधित इतर अत्यावश्यक सेवा पुरविणारी कार्यालये वगळता इतर कार्यालये अथवा आस्थापना 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये कर्मचारी व ग्राहक यांची गर्दी होणार नाही यास्तव कामांच्या व व्यवसायांच्या वेळांचे नियेाजन करावे. जेवणाचे वेळी योग्य अंतर राहील याची कार्यालय प्रभारींनी दक्षता घ्यावी.
कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.