९ सप्टेंबर रोजीच हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन पाळला जातो. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला देशप्रेमाचे कर्तृत्व दाखविणारा लहानगा शिरीष कुमार आणि त्यावेळच्या स्थितीची ही कथा….
- मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर लाखोंचा जनसमुदाय जमला होता. त्याच वेळी महात्मा गांधी यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ‘चलेजाव’, ‘भारत छोडो’ आणि ‘करेंगे या मरेंगे’. तो दिवस होता ८ ऑगस्ट १९४२. महात्मा गांधी यांच्या मुखातून बाहेर पडलेले हे निर्वाणीचे शब्द जणू काही धगधगत्या निखाऱ्यासारखे होते.
संपूर्ण देशात स्वातंत्र्य आंदोलनाला वेग आला होता. हजारो तरुण भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण कार्यकर्ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले होते. त्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नंदुरबारचा पंधरा वर्षांचा, आठवीत शिकणारा एक कुमारवयीन मुलगा शिरीष कुमार मेहता देखील होता. त्याची आई सविता आणि वडील पुष्पेंद्र मेहता हे दोघेही स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले होते.
शिरीष कुमारला लहानपणापासून स्वातंत्र्य, देशाभिमान आदींचे बाळकडू मिळाले होते. महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्याचे आदर्श होते. शिरीष कुमारचे घर म्हणजे कार्यकर्ते व क्रांतिकारकांचे मंदिर होते. भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. महात्मा गांधी यांच्या सुटकेसाठी ठिकठिकाणी मोर्चे निघाले. शिरीषकुमार यांनी देखील आपल्या मित्रांसमवेत नंदुरबार शहरात मोर्चा काढण्याचा निश्चय केला. ९ ऑगस्ट १९४२ रोजी नंदुरबार शहरात भव्य प्रभात फेरी निघाली.
‘नही नमेगी, नही नमेगी, निशाण भूमी भारत’ अशा घोषणा देत मोर्चा निघाला. पोलीस चौकीसमोर मुलांनी घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी अटक केली आणि सायंकाळी सोडून दिले. परंतु त्यानंतर पुन्हा रोजच मोर्चे निघू लागले. कधी मशाल मोर्चा, तर कधी हात फलक घेऊन मोर्चा असा प्रकार महिनाभर सुरू होता. हळूहळू सारा गाव शिरीष कुमार आणि त्याच्या साथीदारांच्या मागे जमू लागला.
शिरीष कुमारने शाळेतही घोषणाबाजी सुरू केल्याने मुख्याध्यापकांनी त्याला समज दिली. परंतु मुलांचा जोर आणखीनच वाढला. महिनाभराचा कालावधी उलटला तरी महात्मा गांधी आणि सहकार्यांची सुटका झाली नव्हती, त्यामुळे आंदोलन आणखीनच तीव्र होऊ लागेल. ९ सप्टेंबरचा दिवस उजाडला. नंदुरबार शहरातून प्रभात फेरी निघाली. त्यात शिरीष कुमार आणि त्याचे सवंगडी अग्रभागी होते. त्यांनी शाळेत तिरंगा फडकला आणि मिरवणुक पोलीस कचेरी जवळ आली. शिरीष कुमारच्या हातात तिरंगी झेंडा होता.
पोलिसांनी मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. तसेच मोर्चा अडविण्याचा प्रयत्न केला. शिरीष कुमार आणि साथीदार माणिक चौकात शांततेत तिरंगा फडकवून माघारी फिरणार होते. परंतु पोलिस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे शिरीष कुमार आणि त्याच्या साथीदारांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलीस संतप्त झाले. त्यांनी तिरंगा झेंडा जप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिरीषकुमार याने हातातून झेंडा देण्यास नकार दिला. ‘प्राण घ्या पण झेंडा मिळणार नाही’, असे बाणेदार उत्तर शिरीष कुमार याने दिले.
पोलीस अधिकाऱ्यांनी गोळीबार करण्यासाठी नेम धरला. शिरीषकुमार म्हणाला, ‘गोळी मारायची तर मला मारा, हा मी इथे उभा आहे’, पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या तीन गोळ्या शिरीषकुमारच्या छातीवर बसल्या. तो जागीच कोसळला. या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे चौघे देखील शहीद झाले. मोठा गोंधळ उडून पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांनी तेरा कार्यकर्त्यांना अटक केली. शिरीष कुमार आदि हुतात्म्यांचे बलिदान सार्थ ठरले. देश स्वतंत्र झाला. नंदुरबार शहरात बाल क्रांतिकारक शिरीष कुमारचे स्मारक आहे. हे स्मारक नेहमीच बलिदानांची साक्ष देते.