नाशिक – कोरोनाचा फटका सर्व क्षेत्रांना बसत असून माजी सैनिकांसाठीच्या ध्वजनिधी संकलनालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी निश्चित उद्दीष्टापेक्षा केवळ ५४ टक्केच निधी जमा झाला आहे. गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्याला शासनाकडून ध्वजदिन निधी संकलासाठी १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या उद्दीष्टापैकी ५४.८१ टक्के म्हणजेच रूपये ७० लाख ९७ हजार २०० इतका निधी संकलित केला आहे. यावर्षी देखील शासनाकडून आपल्या जिल्ह्याला १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.
देशाची सीमा सुरक्षित रहावी यासाठी आपले सैनिक त्यांच्या आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग करून सीमेवर आपले कर्तव्य निभावत असतात. कर्तव्य पार पाडताना प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान देखील देतात. सैनिकांप्रती आपली निष्ठा दाखविण्यासाठी ७ डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो. ध्वजदिन निधी संकलनासाठी समाजातील सर्वच घटकांनी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते ध्वजदिन २०२० निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले, जिल्हा सैनिक कार्यालयातील कर्मचारी नवनाथ दाने, संजय थोरात, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, १९४९ पासून प्रत्येक वर्षी ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन साजरा करण्यात येतो. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत या दिवसापासून ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ करण्यात येत असतो. संकलित करण्यात येणाऱ्या निधीचा वापर धारातीर्थी पडलेल्या तसेच अपंगत्व आलेल्या सैनिक, युद्धविधवा, माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबाच्या कल्याणासाठी करण्यात असतो. या निधीच्या माध्यमातून आपली देशाच्याप्रती असलेली भावना व आदर व्यक्त करण्यासाठीचे साधन म्हणून ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय प्रशसकीय सेवेतील अधिकारी यांनी रूपये पाच हजार, वर्ग १ अधिकारी यांनी दोन ते तीन हजार व इतर अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सशस्त्र सेना ध्वजदिना निमित्त रूपये पाच हजारांचा निधी देवून धजदिन निधी संकलानाचा प्रारंभ केला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांना तिन्ही दलाचे प्रतिक असलेला ध्वज आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले.