मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता ग्लोबल शेतकरी होण्याच्या मार्गावर आहे. रांचीमध्ये त्याच्या शेतात होणाऱ्या भाजीपाल्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढत आहे.
सारे काही नियोजनानुसार झाले तर लवकरच दुबईच्या लोकांना माहीच्या शेतातील भाजी खायला मिळणार आहे. धोनीच्या शेतातील टमाटर, कोबी, वटाणा, शिमला मिर्चीची चर्चा सध्या दुबईपर्यंत पोहोचली आहे. सध्या धोनी दुबईमध्ये कुटुंबासोबत सुट्यांचा आनंद लुटत आहे. तिथेच त्याला अनेक लोकांनी भाज्या दुबईत आणण्याची विनंती केली आहे. एवढेच नव्हे तर काही कंपन्यादेखील धोनीच्या शेतातील भाजी विकण्यासाठी पुढे आल्या आहेतय अर्थात यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय होईल, असे सूत्रांकडून कळते. आपल्या शेतातील भाजीपाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जावा असे कुणालाही वाटेल. धोनीला देखील तसेच वाटत आहे. आपल्या भाजीपाल्याची चर्चा दुबईत होत आहे, हे कळल्यानंतर त्याने दुबईतील काही मित्रांचा सल्लाही घेतला. त्यानंतरच तो आपल्या भाजीपाल्याचे मार्केटिंग करू शकणाऱ्या कंपनीचा शोध घेऊ लागला.
रांचीच्या बाजारात माहोल
माहीच्या शेतातील भाजीपाल्याने रांचीच्या बाजारात चांगलाच माहोल केला आहे. या भाज्यांची चांगलीच विक्री होत आहे. लोक मोठ्या प्रमाणात हा भाजीपाला खरेदी करीत आहेत. जैविक शेतीच्या माध्यमातून उत्पादन घेतल्यामुळे त्याची मागणीही जास्त आहे. उत्पादन वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने काही भाग दुबईला पाठविण्यात येईल. झारखंड कृषी विभाग धोनीच्या शेतातील भाजीपाला विदेशात पाठविण्यावर विचार करीत आहे. राज्य सरकार यासाठी एका एजन्सीवर जबाबदारी सोपविण्याचा विचार करीत आहे. धोनीमुळे इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असेही सरकारला वाटत आहे.