झारखंड मधील शेतकऱ्यांना अधिकाधिक दुध उत्पादन करून देणाऱ्या गायी उपलब्ध करून देणे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसवून देणे हे माहीचे स्वप्न आहे. मात्र अजून माहीने आपली ही योजना जाहीर केलेली नाही. फार्म हाउस वर काम करणाऱ्या लोकांच्या मते काम सुरु झाले तेव्हाच माही च्या मनात या योजनेने घर केलेले होते. त्याच्या मते स्थानिक वातावरणात राहू शकेल मात्र डेन्मार्क च्या गायींसारखे भरघोस दुग्ध उत्पादन करू शकेल अशी गायींची प्रजाती विकसित केली गेली पाहिजे. यासाठी पशु चिकित्सक असलेल्या आपल्या जवळच्या मित्राची मदत सुद्धा माही घेतो आहे.
एक वर्षा नंतर प्रत्यक्षात येणार
धोनीची योजना ही आजपासून जवळपास वर्षभरानंतर शेतकऱ्यांना गायींचे वितरण करण्याची आहे. कोणत्या शेतकऱ्याला कोणती गाय दिली आहे याची नोंद ठेवण्यात येईल. वेळोवेळी या शेतकऱ्यांशी संपर्क करून गायींची प्रगती आणि स्थिती काय आहे याची चौकशी केली जाईल. जे शेतकरी गायींकडे दुर्लक्ष करत आहेत असे आढळून आले, त्यांच्याकडून गाय परत घेतली जाईल. सध्या धोनीच्या फार्म हाउस वर जवळपास १०५ गायी आहेत. यांमध्ये थेट फ्रान्स वरून आणलेली फ्रीजियन, तसेच भारतीय वंशाच्या साहीवाल, आणि इतर स्थानीय गायींचा समावेश आहे.
सध्या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून धोनी फुलकोबी आणि टोमॅटो यांचे उत्पादन घेऊन विक्री करतो आहे. लवकरच वाटाण्याच्या शेंगा सुद्धा त्याच्या फार्ममधून बाजारात जाणार आहेत. रांची शहरात सहा ठिकाणी धोनीने आपल्या शेतातील उत्पादनांची विक्री करणारी केंद्रे बनवली आहेत. या केंद्रांतून भाजी, दुध इत्यादींची विक्री केली जाते.