मनाली देवरे, नाशिक
प्रचंड अनुभवी असलेला महेंद्रसिंग धोनी आणि तितकाच अनुभवी असलेला चेन्नई सुपर किंग्स संघाला आज नव्या दमाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि जास्तीत जास्त युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने ४४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून एक अप्रत्याशित असा विजय मिळवला. दिल्लीच्या ३ बाद १७५ या मजबूत धावसंख्येचा पाठलाग करताना मुरली विजय, शेन वॉटसन, केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखे मोठे मोठे फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. दिल्लीच्या ताफ्यात असलेले कागिसो रबाडा, अक्षर पटेल, नाॕर्टजे, आवेश खान आणि अमित मिश्रा यांच्यापैकी कोणीही स्टार गोलंदाज नाही. परंतु आज त्यांच्याच गोलंदाजीवर चेन्नईचे सगळे स्टार फलंदाज अपयशी ठरले.
क्षेत्ररक्षण निवडण्याचा निर्णय ठरला चुकीचा
दिल्ली कॅपिटल्स संघातली बेजोड गुणवत्ता, स्वतःच्या संघावर धोनीने ठेवलेला अवाजवी आत्मविश्वास, खेळपट्टीला पारखण्यात झालेली त्याची चुक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या सिझनच्या पहिल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करणारे संघ पराभूत झालेले असताना देखील टाॕस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला चुकीचा निर्णय ही आहेत चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या आजच्या पराभवाची महत्त्वाची कारणं. सलग दोन साखळी सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता मात्र धोनीसह संपूर्ण सीएसके संघाला आत्मचिंतन नक्कीच करावे लागेल. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा सुरु झाल्यापासून ७ दिवसात ३ सामने खेळलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे आता मात्र पुढील ७ दिवस आराम आणि दोन पराभवाची कारणमिमांसा करण्याची संधी आहे. त्यांचा सामना आता थेट २ आॕक्टोबरला सनरायझर्स हैदराबाद संघाविरुध्द होईल.
पृथ्वी “शाॕ”नदार फलंदाज
दिल्ली कॅपिटल्स संघातील अवघ्या २० वर्षाचा खेळाडू पृथ्वी शाॕ याने आज सामन्यातली सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली. अजिंक्य रहाणे सारखा दमदार खेळाडू संघात येण्याची वाट बघतोय.स्पर्धा आहे. त्यामुळे पृथ्वीला स्वतःला सिद्ध करणे तितकेच गरजेचे होते. अवघ्या ४३ चेंडूत ६४ धावा करताना पृथ्वी शॉ ने पुस्तकात वर्णन केलेले तंत्रशुध्द ९ चौकार आणि १ षटकार मारतांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पेश केली. श्रेयस अय्यर हा धोनीचा एकेकाळचा शिष्य. परंतु या सामन्यात श्रेयसने नेतृत्व करतांना आपल्या गुरुवर मात करून धमाका केला आहे.
शनिवारचा सामना
यंदाच्या आयपीएलचा आठवा सामना अबुधाबीतल्या शेख झईद मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल. दोन्ही संघांनी या मोसमात आतापर्यंत १-१ सामना खेळला असून दोघांनाही विजय नोंदविता आलेला नाही. त्यामुळे अंकतालिकेत गुणांचे खाते कोण उघडतो? इतकेच या सामन्याचे आकर्षण असेल.