मनाली देवरे, नाशिक
…..
शनिवारी झालेल्या डबल धमाका सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स, बंगलोर संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला. तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सने दिल्ली कॅपीटल्स संघाने ५ गडी राखून जिंकला आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या पुढच्या प्रवासात अडथळा निर्माण करून ठेवला आहे. शुक्रवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स ने राजस्थान रॉयल्सचा नुसता पराभवच केला नाही तर साखळीतून प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याचे राजस्थान संघाचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात आणले. शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स संघातला सामना अखेरच्या षटकापर्यन्त चांगलाच रंगला. आरसीबी हा सामना नक्की गमावणार अशी स्थिती निर्माण झालेली असतांनाच एबी डिव्हीलियर्सने सगळी सुत्र हातात घेतली आणि एकहाती सामनाचे भवितव्य फिरवून सामना जिंकला. अवघ्या २२ चेंडूत त्याने काढलेल्या ५० धावा राजस्थान संघासाठी फार महागडया ठरल्या. देवदत्त पडीकलने ३५ धावा करतांना नेहमीप्रमाणे आरसीबीला चांगली सुरूवात करून दिली व त्यानंतर विराट कोहलीने डावाला आकार दिला होता. त्याच्या ४३ धावा विजयासाठी पुरेशा ठरणार नाहीत अशी शंका वाटत असतांनाच डिव्हीलियर्स फलंदाजी करतांना थेट टॉप गिअरमध्ये फलंदाजी करायला सुरूवात केली. ६ षटकार आणि १ चौकार ठोकतांना डिव्हीलियर्स ने राजस्थानला मोठा हादरा दिला.
हा सामना सुरू होण्याआधी राजस्थानने एक व्टिट करून, ते वाळवंटाची सफर करण्यासाठी एबी डिव्हीलीयर्स आणि विराट कोहलीला दोन फ्री पासेस देत आहेत आणि ही ऑफर सामना कालावधीत म्हणजे ३.३० ते ७.३० या कालावधीपुरतीच मर्यादित राहील असे गमतीने म्हटले होते. प्रत्यक्षात आरसीबीच्या या दोन फलंदाजांनी मात्र आता याचे उत्तर देवून मैदानातच देवून टाकले आहे आणि राजस्थान संघाच्या वाळवंट परतीची तिकीटे बुक केली आहेत असे म्हणायला हरकत नाही.
अक्षर पटेलने बिघडवले चेन्नईचे गणित
दुसरा सामना आज चेन्नईने गमावला. आजचा दिवस होता तो गब्बर म्हणून ओळख असलेल्या शिखर धवनचा. त्याने खुप चांगली फलंदाजी केली परंतु त्याला चान्स देखील खुप मिळाले. ४ वेळेस त्याचा झेल सुटला आणि ९९ वर असतांना फिल्ड अंपायरने बाद दिल्यानंतरही टी.व्ही. अंपायरने मात्र तो नाबाद असल्याचा कौल दिला. त्याचे संपूर्ण आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक, परंतु ते चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द आल्याने चेन्नईचे फॅन मात्र आज कमालीचे नाखुष झाले. आजचा दिवस चेन्नईचा नव्हताच. ब्राव्हो सारखा गोंलदाज दुखापतीमुळे मैदानात नव्हता. शिखर धवनचे झेल सुटले. अखेरच्या षटकात १७ धावा हव्या असतांना खेळून गेला तो फलंदाजीसाठी फारसा प्रसिध्द नसलेला अक्षर पटेल.
टॉप चार संघ हळुहळू निश्चीत होणार
आता प्रत्येक निकालानंतर पहिले चार संघ आणि साखळीबाहेर फेकले जाणारे चार संघ कोणकोणते असतील हे स्पष्ट होण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. आता राजस्थानसाठी टॉप चार मध्ये स्थान पटकावणे अवघड होणार आहे. कारण ९ सामन्यात फक्त ३ विजय मिळाल्याने त्यांचे अवघे ६ गुण झाले आहेत. त्यांना, उर्वरीत ५ सामन्यात विजय तर मिळवावाच लागेल परंतु तो देखील नेट रनरेट भक्कम ठेवून. त्यामुळे राजस्थानचे या सिझनमधले विजेतेपदासाठीचे भवितव्य धुसर होत असल्याची चिन्हे आहेत. याउलट या विजयानंतर आरसीबी संघाने माञ पहिल्या ४ संघातील आपले स्थान २ गुण मिळवून आणखी मजबुत केले आहे.
रविवारचे सामने
रविवार म्हणजे देखील डबल धमाका. सनराजझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स अबुधाबीत तर मुंबई इंडीयन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन संघ दुबईत आमने सामने रहातील.