धुळे – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अमरिश रसिकलाल पटेल (भारतीय जनता पार्टी) विजयी झाले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अभिजित मोतीलाल पाटील यांचा पराभव केला. श्री. पटेल यांना ३३२, तर श्री. पाटील यांना ९८ मते मिळाली. चार मते अवैध ठरली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते श्री. पटेल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यानंतर आज सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मतमोजणीला सुरवात झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी, जिल्हाधिकारी संजय यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे (नंदुरबार) उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो) यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी विजयी उमेदवार श्री. पटेल यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर श्री. पटेल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार उपस्थित होते.