कोरोना विषाणूच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख आदी उपस्थित होते.
अँटिजेन चाचण्या वाढवा
सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करावेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना अंमलात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांनासोशल डिस्टन्सिंग, मास्कच्या वापरासाठी प्रवृत्त करावे. वाढती रुग्ण संख्या पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेने अहवाल वेळेत उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. अति जोखमीच्या रुग्णांवर तातडीने उपचारासाठी अँटिजेन चाचण्या वाढवाव्यात.
प्रसूतीसाठी स्वतंत्र व्यवस्था
कोरोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचार करतानाच संभाव्य रुग्ण वाढीचे नियोजन आतापासून तयार ठेवावे. ते करतानाच नॉन कोविड रुग्ण व प्रसूतीसाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित करावी. त्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची मदत घ्यावी. याबाबत महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यादव यांनी चर्चेअंती निर्णय घ्यावा, असेही निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी यादव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. याशिवाय त्यांनी शिरपूर, दोंडाईचा, साक्री येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकसहभागासाठी आयोजित बैठकांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी कोरोना विषाणूविषयी जनजागृतीसाठी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपाययोजनांची, तर पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी गणेशोत्सव, कोरोना विषाणू, मोहरमसाठी तैनात केलेल्या बंदोबस्ताची माहिती दिली.