पेठ तालुक्यातील करंजळी येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन
दिंडोरी – आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
पेठ तालुक्यातील करंजळी येथे आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनील भुसारा, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड, उपव्यवस्थापक रोहित बनसोडे, तहसीलदार संदीप भोसले आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ म्हणाले की, शेतकरी शेतात अन्न धान्य पिकवतो, त्या शेतमालाला मिळणाऱ्या भावाला चढ उतार असतात; परिणामी शेतकऱ्याचे नुकसान देखील होण्याची शक्यता असते. मात्र, आधारभूत हमीभावामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव तर मिळणारच आहे; पण त्यासोबत शेतमालाची विक्री करून मिळणारे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. महामंडळ आधारभूत हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी करणार नाही तसेच शेतकऱ्यांनीही इतर व्यापाऱ्यांना विक्री करताना हमीभावपेक्षा कमी दराने विकू नये; म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना आदिवासी विकास महामंडळाला पुन्हा ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भात गिरण्यांचा प्रश्न नेहमीच उपस्थित होत आहे. त्यासाठी सहकार विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पेठ तालुक्यातील सहकारी सोसायट्या तसेच या संबंधित असलेल्या संस्था यांसोबत चर्चा करून वरिष्ठ स्तरावर निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
कोरोनामुळे विकासकामांची गती कमी झाली; मात्र राज्य शासन आता हळूहळू सर्वच स्तरावर विकासकामे सुरू करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झालेला असला तरी देखील पूर्णतः नायनाट झालेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा त्यादृष्टीने पूर्णतः तयारीत असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले. महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनील भुसारा यांनी यावेळी बोलताना सांगितले की, धान खरेदी केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात येणार आहे. वेळेत शेतमालाचे मोजमाप होऊन शेतकऱ्यांना त्या मालाचे पैसे मिळणार आहे. राज्य शासनाने देखील आता विकासकामे सुरू केलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कसोशीने प्रयत्न केले आहेत. खावटी योजना देखील लवकरच सुरू होणार असून ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन आमदार भुसारा यांनी यावेळी केले.
प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड यांनी माहिती देताना सांगितले की, शेतकरी तसेच कास्तकरी लोकांना महामंडळातर्फे धान खरेदी बाबत असलेल्या नव्या योजनांची पूर्णपणे माहिती दिली जात असल्याने गेल्या ३ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये आधारभूत हमीभाव केंद्रांतर्गत धान खरेदीमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी रोखीने होणारे व्यवहार आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात होत आहेत. सध्या जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण २५ केंद्रे स्थापन होत आहेत. करंजळी येथील आधारभूत केंद्रामध्ये असलेल्या धानाचा प्रति क्विंटल हमीभाव यामध्ये अ दर्जाचा भाताचा दर रु. १८८८, साधारण भाताचा दर रु. १८६८, हायब्रीड ज्वारीचा दर रु. २६२०, मालदांडी ज्वारीचा दर रु. २६४०, मक्याचा दर रु. १८५०, बाजरीचा दर रु. २१५० तर नागलीचा दर रु. ३२९५ असल्याचेही प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड यांनी सांगितले.