मदत करू नका, पण त्रास तरी देवू नका” इतकी माफक याचना घेऊन मुलाला घडविण्याच्या धडपडीतून, स्वाभिमानाने जगण्याच्या तळमळीतून, घडलेल्या आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुंटुबांतील प्रत्येक स्त्रीलाच नव्हे तर संपूर्ण स्त्रीयांना प्रेरणादायी ठरलेल्या श्रीमती ज्योतीताई देशमुख यांच्या या धाडसाला सलाम….
सौ. अर्चना प्रविण देवरे
……
प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया या अग्रेसर आहेत, त्यात काहीच वावगं नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने स्त्रीया कार्यरत आहेत. पण पुरुषाला खांदा देवून ज्या शेतीच्या नापीकीमुळे आणि कर्जामुळे घरातील धडधाकट पुरुषांनी आत्महत्या केल्यात, स्वत:चे जीवन संपविले तीच शेती करण्याची जिद्द जेव्हा एक स्त्री करते आणि अतोनात कष्टातून शेती व्यवसायात यशस्वीपणे स्वत:ला सिध्द करते आणि मुलाला ही घडवते तेव्हा तिच्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम करायला हवा…
अकोला जिल्ह्यातील कट्यार गावात राहत असलेल्या ज्योतीताई देशमुख. पहिले घरातील कर्ता पुरुष म्हणजे सास-यांनी केलेली आत्महत्या पाहिली, त्यानंतर दिराने ही आत्महत्या केली, आणि हे इतक्यावरच नाही थांबले तर पतीनेही आत्महत्या केली. अशा तीन आत्महत्या पाहिल्यानंतर कोणाच्याही पायाखालची जमीनच सरकेल. ज्योतीताई सुध्दा या सर्व आत्महत्यामुळे खचल्या, पण, जिद्द त्यांची खचली नाही. पतीची आत्महत्या सगळंच उध्वस्त करुन गेली होती. नववीत शिकत असलेल्या मुलाच्या डोक्यावरचं बाप नावाच छप्पर ही उडालेले होते. घराला खंबीर असा आधारच राहीला नव्हता.
पण, अशा स्थितीत ज्या शेतीने घरातील तीन जीव घेतले तीच शेती पुर्ववत करण्याचे धाडस ज्योतीताईनी केले. पतीच्या मॄत्युनंतर शेती विकण्याचे सल्ले अनेकांनी दिले. पण “शेती करा ” असं कुणीच म्हटल नाही. उलट शेतीने घरातील जीव घेतले म्हणून लोकांनी टोमणेच दिलेत. असं असतांना ही ज्योतीताईंनी एकोणतीस एकर शेत जमीन स्वत: कसण्याचे ठरविले. शेतीतील काहीच माहित नसतांना देखील शेती करायचे धाडस त्यांना खूप कठीण होते. ते करताना येणा-या अनेक अडचणीना सामोरे जाण्याची जिद्द त्यांनी ठेवली आणि कुठल्याही परिस्थितीत मी हरणार नाही व खचणार ही नाही, हे स्वत:ला कायम ठणकावून सांगत राहिल्या. सुरुवातीला शेतातील कुठलच काम येत नसल्यामुळे खूप त्रास झाला. एकीकडे एकटी स्त्री शेतात काम करते, हे पाहतांना अनेक पुरुषी नजरा टवकारत होत्या. या सगळयातुन आणि शेतीच्या कामातून त्यांच्यात एक वेगळेच धाडस निर्माण होत गेले. मनातील भीती दूर होत गेली. नांगरणीसाठी लागणार ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरर चालक यांची वारंवार विनवणी करावी लागत होती, दिवसभर इतरांची नांगरणी करुन रात्रीच्यावेळी नांगरणी करण्यास येणारा टॅक्टर आणि चालक, त्यांच्या मनमानी कॄत्यामुळे ज्योतीताईंनी एक दिवस मी स्वत:च ट्रॅक्टर घेईन अन मीच चालविण असे जेव्हा चालकाला सांगितले. पण, तेव्हा हे धाडस गमंतीने घेतले गेले. पण, ज्योतीताईंनी हे धाडस पूर्ण केले. एक स्त्री सर्व काही करु शकते हे ही त्यांनी त्याला दाखवून दिले. त्यांनी नुसतेच ट्रॅक्टर घेऊन, दुस-याला चालवायला देण्यापेक्षा त्या स्वतःच ट्रॅक्टर चालवायला शिकल्या. आणि नांगरणीची कामे त्या स्वताच करायला लागल्या. ज्या गावान स्त्री म्हणून हिणवल त्याच गावात स्वत: ट्रॅक्टर चालवत शेती करायला लागल्या. त्यांनी घेतलेल पहिलं सोयाबीनच पीक पाहता अख्या गावान सोयाबीनचे पीक केले. आणि ज्या घराची कौल लोक काढून नेत होती, तेच घर त्यांनी पहिले बांधले. अशा परिस्थितीत मुलाच्या बाबतीत
त्यांनी पित्याची ही कर्तव्य चोख बजावली. कतृत्त्ववान पित्यानं घडवावं तसं तीने मुलांना घडवलं. शेतकरी कुटुंबातील कुटूंब प्रमुख एक महिला आणि ती ही शेतीवर उदरनिर्वाह करणारी असून अशा ज्योतीताईंनी मुलाला उच्च शिक्षित – कॉम्प्युटर इंजिनियर केले. त्याच्या शैक्षणिक वाटचालीत व्यत्यय येवू नये म्हणून अनेक अडचणी झेलत, त्यांना काहीच कमी पडू दिले नाही. शेतीच्या व्यवसायाने घरातील तिघांनी जीवंत घेतलेले बळी पाहता मुलाला वेगळं क्षेत्र निवडून, शिकवून स्वाभिमानाच जगण दिले. पुण्यात एका मोठ्या कंपनीत मुलगा नोकरीस आहे. पण शेती व्यवसायाबद्दल ही उदासिनता निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातुनच ज्योतीताई स्वत: शेतीकडे वळल्या. शेतीतून मिळणा-या पीकावर जगाचं पोट उभ आहे. या जाणीवेतून ज्योतीताईंनी शेती कसत पीक घेतली. आता त्या यशस्वीपणे शेतीतून उत्पन्न घेत आह. ही आत्महत्याग्रस्त अनेक कुटूंबातील मुलांना आणि आईला मोठी शिकवणच आहे. त्यांच्या या कार्यातून, धाडसातून मंत्री बच्चु कडू यांनी त्यांच्या कामाचा, कतृत्त्वाचा सन्मान करत संपूर्ण गाव शेतीसाठी दत्तकच घेतले.
हे इतकं सोपं नाही जितकं बोलणे किंवा लिहीणे असू शकते. कारण हा प्रवास ज्योतीताई साठी अत्यंत कठीण होता. पावलोपावली पायाखाली मऊशार मातीची ढेकळ जरी होती तरी डोक्यावर रणरणत्या तापणा-या उन्हाच्या झळा आणि मनात निसर्गाच्या तडाख्यात पुन्हा सापडण्याची भिती, क्षणोक्षणी असुरक्षितता करत होती. या सगळयातुन शारीरिक धडधाकटपणा आणि मानसिक पाठबळ कायम टिकून ठेवण अत्यंत कठीण. प्रत्येक स्त्रीने संकटावर मात करुन संकटानतर खंबीरपणे उभे राहण्यासाठी ज्योतीताई एक ज्वलंत उदाहरण आणि प्ररेणा आहे. त्यांच्या या कार्यास आणि धाडसास आमचा सलाम आहे…