मुंबई – कोरोनाची दुसरी लाट भलतीच वेगवान आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती रुग्णाला गाठतेच आहे. काेणतेही क्षेत्र या रोगापासून वाचलेले नाही. अभिनेता आमीर खानला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरातील तीन नोकरांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. इ टाईम्सच्या वृत्तानुसार, धर्मेंद्रच्या जुहूतील बंगल्यावरील तिघेजण कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. यामुळे सावधगिरी म्हणून धर्मेंद्रने देखील कोरोनाची चाचणी केली असून ते सध्या रिपोर्ट्सच्या प्रतीक्षेत आहेत.
नोकरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर योग्य ती काळजी घेतली जात आहे. या तिघांनाही क्वारंटाईन केले असून त्यांची काळजी घेतली जात आहे. अनेक महिन्यांपासून धर्मेंद्र आपल्या लोणावळा येथील फार्महाऊसवर होते. नुकतेच ते मुंबईला परतल्याचे इ टाइम्सच्या सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत धर्मेंद्र यांना विचारले असता, आपण ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. मी कोरोनाची लस घेतली आहे. परंतु, आता पुन्हा चाचणी केली असून अहवालाची वाट पहात आहे.
लोकप्रिय अभिनेता असलेले धर्मेंद्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात. शेतीशी संबंधित पोस्ट्स ते नेहमी शेअर करत असतात. या पोस्ट्स लोकांनाही आवडतात.