बरेली (उत्तर प्रदेश) – बरेलीमध्ये शाळेत जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीला टवाळखोराने पकडून ऊसाच्या शेतात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी टवाळखोराला पकडून धो धो धुतलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. मात्र आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनाच मारहाण करून पोलिसांनी तुरुंगात टाकलं.
पोलिसांच्या कारवाईमुळे संतप्त हिंदू संघटनांनी पोलिस ठाण्याचा घेराव करून मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
बरेली कॅंट परिसरातील एका गावच्या १६ वर्षीय तरुणी ही फरिदपूरच्या दियोरनिया पोलिस हद्दीतील माध्यमिक विद्यालयात इयत्ता १०वीत शिक्षण घेते. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, ती गुरुवारी शाळेत जात असताना सिमराबोरीपूर गावातील बाजाराच्या समोर बुखारा रोडवर तिच्या शेजारच्या आरिफनं तिला पकडलं.
तिनं आरडाओरड केल्यानं तिला टवाळखोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात फरफटत घेऊन जाऊ लागले. आरडाओरड ऐकल्यानंतर आसपासचे शेतकरी घटनास्थळी पोहोचले. तिला टवाळखोराच्या तावडीतून सोडवून त्यांना धो धो धुतलं. माहिती मिळताच तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी जखमी आरोपींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
विद्यार्थिनीचे कुटुंबीय गुन्हा दाखल करण्यासाठी दियोरनिया पोलिस ठाण्यात पोहोचले. तेव्हा पोलिस कर्मचार्यांनी विद्यार्थिनीचे वडील आणि आजोबांना मारहाण केली आणि तुरुंगात डांबलं. विद्यार्थिनीनं या घटनेची माहिती हिंदू संघटनांना दिली. संघटनांचे कार्यकर्ते पोलिस ठाणे परिसरात पोहोचले आणि त्यांनी घेराव घालून गोंधळ घातला.
पोलिसांनी संशयित आरिफविरोधात गुन्हा दाखल करून विद्यार्थिनीचे वडील आणि आजोबांना तत्काळ तुरुंगातून बाहेर काढलं. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप निराधार आहे, असं दियोरनिया पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित कुमार यांनी सांगितलं.
एक महिन्यापासून धर्मांतरणासाठी दबाव
विद्यार्थिनीनं सांगितलं, की एक महिन्यापासून आरिफ तिचा पाठलाग करत होता. त्यानं अनेकवेळा अश्लील शेरेबाजीसुद्धा केली. धर्मांतरण करण्याचा प्रस्ताव ठेवला. शिक्षण सुटेल या भीतीनं ती शांत राहिली.