मुंबई – भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच सात धर्मासाठी सात प्रमुखांची नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी मो.एजाज देशमुख व प्रभारी नागनाथ (अण्णा) यांनी ही नियुक्ती घोषित केली.
भाजप….पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखला जातो. भाजपने आजवर खरोखरच नसलेली प्रथा सुरु करीत, प्रत्येक धर्मासाठी स्वतंत्र प्रमुख नेमल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या या कार्यकारीणीत आठ उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस, दहा चिटणीस, १ कोषाध्यक्ष व अकरा अन्य प्रमुख असे पद असलेले पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांची घोषणा आज झाली. असे असेल धर्मनिहाय प्रमुख
जैन प्रमुख – संदीप भंडारी (पुणे)
ख्रिश्चन प्रमुख-जयराम डिसुझा ( मिरा भायंदर)
शीख प्रमुख-सुरेंद्रसिंग सूरी (मुंबई)
ज्यु प्रमुख-ससून फणसापूरकर (मुंबई)
सिया प्रमुख-सय्यद मुस्तफा (औरंगाबाद)
बोहरी समाज प्रमुख- जोएब बुटावाला (मुंबई)
नवबौध्द प्रमुख-विकास गुजर पगारे (नाशिक)
या व्यतिरिक्त इतर पदेही नेमले आहे.
महिला प्रमुख – सुल्ताना समीर खान (मीरा भाईंदर)
शिक्षक प्रमुख – डॉ.प्रा.शेख शाकेर राजा (औरंगाबाद)
विधी प्रमुख – अँड.सिकंदर अली (औंरंगाबाद)
पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये धर्मनिहाय प्रमुख करण्यात आले आहेत. आजवर राजकीय पक्ष प्रमुख कार्यकारीणीत सर्वांनाच स्थान देणे शक्य नसल्याने महिला, युवक,व्यवसाय, अल्पसंख्याक आदी आघाडयांची स्वतंत्र कार्यकारीणी नियुक्त करीत असतो. यामध्ये विविध आघाडी, त्यांचे पदाधिकारी नियुक्त करतांना जात, धर्म यानुसार नियुक्त्या करणे नवे नाही. मात्र त्यांची जाहीरपणे चर्चा किंवा धर्माच्या उल्लेखासह नियुक्ती झाल्याचे उदाहरण अपवादानेच असेल, पार्टी विथ डिफरन्स, जगातील सर्वात मोठा पक्ष ही बिरूदावली मिरवणाऱ्या भाजपने ही नवीन प्रथा मात्र सुरु केल्याचे दिसते.
…..म्हणून नेमले धर्मनिहाय प्रमुख
कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी संख्येस मर्यादा असते. अल्पसंख्याक गणले जाणारे सात धर्म आहेत. त्या प्रत्येकासाठी एक प्रमुख नियुक्त केला आहे. शीया व पारशी समाजाला देखील प्रतिनिधीत्व देण्याची इच्छा आहे. आमचा पक्ष सर्वांना सामावून घेणारा आहे. त्यामुळे असा राजकीय प्रयोग केल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले.