धम्मचक्र प्रवर्तन दिन : ऐतिहासिक क्रांतीचा सोनेरी क्षण
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या निमित्त विशेष लेख….
आधुनिक युगात २० व्या शतकामधील भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचे मुख्य प्रणेते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय . हजारो वर्षे येथील पददलित समाजाला धर्माच्या नावाने दाबून टाकण्यात आले होते. त्या पददलित समाजाला डॉ. बाबासाहेबांनी आपल्या हक्काची जाणीव करून दिली, त्यांना संघर्ष करण्यास प्रेरित केले. बाबासाहेब केवळ एक क्रांतिकारक राजकीय किंवा धुरंधर नेते नव्हते, तर एक गंभीर अभ्यासक, थोर विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ होते किंबहुना खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब एक महापुरुष होते.
धर्मांतरामुळे लगेच सर्व काही बदलेल, अशी भाबडी समजूत बाबासाहेबांची मुळीच नव्हती, मात्र धर्मांतराने दलितांना मध्ये स्वाभिमान जागृत होणार होता . धार्मिक अंधश्रद्धा आणि उच्च-निचतेने ग्रासलेल्या समाजाला स्वातंत्र्य समता, बंधुत्व यांचे मुल्यवान हक्क मिळणार होते. धर्म आणि जग हे ईश्वरनिर्मित आहे आणि उच्चवर्णीय त्याची नाळ आहेत, असे पारतंत्र्याकडे नेणारे हजारो वर्षांचे जोखड धर्मांतरामुळे फेकले जाणार होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाला माणसासारखी वागणूक मिळेल, हे बाबासाहेबांना माहित होते. म्हणूनच इ.स. १९३५ मध्ये धर्म बदलण्याची बाबासाहेबांनी घेतलेली प्रतिज्ञा अखेर इ.स. १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारल्याने पूर्ण झाली.
यापुर्वी इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले. आणि दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या सुमारे ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून जगाला मानवतेचा नवा मंत्र दिला.
दरम्यान, दि. १२ मे १९५६ रोजी बीबीसीवर झालेल्या मला बौद्ध धर्म का आवडतो? या भाषणात बाबासाहेब म्हणतात, “मला बौद्ध धर्म आवडतो, कारण तो मला तीन तत्वे देतो, जी जगातल्या अन्य कोणत्याही धर्मात नाहीत . सगळे धर्म हे देव, आत्मा, पुनर्जन्म याची व्याख्या करण्यात दंग आहेत. मात्र बौद्ध धर्म मला प्रज्ञा, समता आणि करुणा शिकवतो . बौद्ध धर्म जगाला हेच सांगू इच्छितो की , कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकणार नाही, केवळ मनुष्यच आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने समाजाला वाचू शकतो. आणि ही बुध्दी त्याला प्रज्ञा, शील, करूणा याने प्राप्त होते. तसेच कोणतेही धर्मांतर कटुता निर्माण करू शकते . बौद्ध धर्म हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे . माझे धर्मांतर हे माझ्या देशाच्या संस्कृतीला आणि इतिहासाला धक्का न पोहोचवणारे असेल, याची काळजी मी घेतली आहे.”
विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात जेव्हा हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा विचार आला. त्यावेळी बाबासाहेबांनी संत गाडगेबाबा यांची भेट घेतली. आपली मनस्थिती त्यांच्या जवळ व्यक्त केली. गाडगेबाबांना ही सर्व परिस्थिती जाणत होते. बाबासाहेबांच्या तसेच दलित समाजाच्या हालअपेष्टा, त्यांचा जीवनसंघर्ष त्यांना माहीत होता. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा अभ्यास त्यांची विद्वत्ता त्यांची निर्णयक्षमता सुद्धा त्यांना माहीत होती. म्हणून गाडगेबाबा हे बाबासाहेबांना म्हणाले, “डॉक्टर साहेब, मी अडाणी – अज्ञानी माणूस तुम्ही शिकले-सवरले हायेत. मला इस्वास आहे, तुम्ही जो निर्णय घ्यान तो बरोबरच असन, सारा समाज तुमच्या पाठीशी हाये…”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
परिश्रमातून भारताचे संविधान आकाराला आले . इ.स. १९५० मध्ये आपण भारतीयांनी संविधान स्वतःला अर्पण केले, म्हणजे जनतेने जनतेचे संविधान जनतेला लोकार्पण केले. ही विसाव्या शतकातील सर्वात मोठी घटना म्हणता येईल. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही राज्यव्यवस्थेची दिशा ठरविण्यात आली . समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मुलभुत, नैतिक व कायदेशीर बाबींशी राष्ट्राचे आणि पर्यायाने जनतेचे नाते बांधले गेले. राज्यघटनेच्या उद्दिष्टांमध्ये ही तत्त्वे समाविष्ट करून त्याचा जागर केला गेला. समताधिष्ठित समाज रचनेचे बाबासाहेबांचे स्वप्न ही पहिली पायरी म्हणून बघीतले जाते. त्यानंतरच सामाजिक-आर्थिक अशा लोकशाहीकडे वाटचाल करण्याचा प्रारंभ झाला.
दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी भारतातील बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. लाखो दलित यांनी बौद्ध धम्मात प्रवेश केला. ज्यांना ज्यांना त्या काळात बाबासाहेबांचा सहवास लाभला त्यांनी स्वतःला धन्य मानले. दीक्षाभूमीवर याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण ऐतिहासिक ठरले. त्यापुर्वीची आणखी एक ऐतिहासिक घटना म्हणजे त्यांनी येवला मुक्कामी १९३५ मध्ये एका परिषदेत धर्मांतराची घोषणा होय. समता हे जीवनमूल्यांना मानणाऱ्या धर्माला त्यांनी आपलेसे केले. यांनी केलेल्या अथक प्रयत्नाला यश मिळू शकले . नव्या मूल्यांवर निष्ठा असणारा समाज त्यांनी धम्मदीक्षा घेऊन उभा केला. देशात गौतम बुद्ध यांचे शांती, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या तत्त्वांचे अनुसरण करणारा नवसमाज उभा राहिला. डॉ. बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर भारतात विशेषतः महाराष्ट्रात त्याचा प्रभाव जाणवला. देव, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग या संकल्पनेतून समाज मुक्त झाला . नवा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होऊन अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न सुरु झाला. कारण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांचा नारा होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे वर्णन डॉ. आंबेडकर यांच्या चरित्राचे लेखक व अभ्यासक वसंत मून यांनी आपल्या पुस्तकात केले आहे, लेखक मून लिहतात की, तो दिवस होता, दि. १४ ऑक्टोबर, सकाळी नऊ वाजता बाबासाहेब समारंभस्थळी पोहोचले. व्यासपीठाच्या शिरोभागी सांची स्तूपाची प्रतिकृती तयार केलेली होती. सभास्थळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे पाच लाखांचा जनसमुदाय होता. बाबासाहेबांनी पत्नीसोबत उभे राहून भिक्खू चंद्रमणी महास्थवीर यांच्याकडुन त्रिसरण पंचशील ग्रहण करून दीक्षा घेतली. त्यानंतर दहा वाजता बाबासाहेबांनी समोर हजर असलेल्या सर्वांना उभे राहण्यास सांगून त्यांना दीक्षा दिली व स्वतः तयार केलेल्या 22 प्रतिज्ञा स्वतः वाचून दीक्षार्थींकडून म्हणून घेतल्या. हा दीक्षाविधी सुमारे अकरा वाजता समाप्त झाला.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)