नवी दिल्ली – साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या दिवाळी सणात धनत्रयोदशीला बहुतांश जण सोने खरेदी करतात. ग्राहकांची सुविधा व्हावी याकरिता रिझर्व्ह बँकेने सोन्याचे दर निश्चित केले आहेत. आता प्रति ग्रॅम 5,177 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध करून यासंदर्भात माहिती दिली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दर्जेदार सोन्याच्या बंद किंमतीच्या साध्या सरासरीच्या आधारे बाँडचे नाममात्र मूल्य एका ग्रामला 5177 रुपये निश्चित केले आहे. या बाँडसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्याना आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरणाऱ्याना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. यापुर्वी सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 5,051 होती.
भारतीय रिझर्व्ह बँक भारत सरकारच्या वतीने सॉवरेन गोल्ड बाँड (बंधपत्र) जारी करते. देशात राहणारे भारतीय नागरिक, अविभाजित कुटुंबे, विश्वस्त, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था या बाँडची खरेदी करू शकतात. या योजनेंतर्गत आपण किमान एक ग्रॅम सोने खरेदी करू शकतात. योजनेंतर्गत, एक व्यक्ती आर्थिक वर्षात जास्तीत जास्त चार किलोग्रॅमपर्यंत सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. त्याच वेळी, ट्रस्टची मर्यादा 20 किलो आहे. आपण बँकांकडून (लघु वित्त बँक आणि पेमेंट बँक वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शेड्यूल पोस्ट ऑफिस आणि मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंजकडून सोन्याचे रोखे खरेदी करू शकता. भौतिक सोन्याची मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली.