नवी दिल्ली – अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (१८ ऑगस्ट) सुनावणी झाली. यावेळी सर्व पक्षकारांनी त्यांची बाजू मांडली. परीक्षा का घ्यावी आणि घेण्यात काय अडचणी आहेत या सर्वांबाबत मोठा युक्तीवाद झाला. तर, सर्व पक्षकारांनी त्यांचा अंतिम युक्तीवाद लेखी येत्या तीन दिवसात न्यायालयाकडे सुपुर्द करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीतच परीक्षांबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.
दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) परीक्षांवर ठाम आहे. ३० सप्टेंबरच्या आत परीक्षा घ्याव्यात असा युजीसीचा आग्रह आहे. तसेच, राज्यांना परीक्षा रद्दचा अधिकार नसल्याचे युजीसीने युक्तीवादात म्हटले आहे. तर, कोरोनामुळे परीक्षा घेण्यात असंख्य अडचणी आहेत. परिवहन, होस्टेल, कॉलेज, परीक्षा केंद्र अशा विविध पातळ्यांवर अडचणी आहेत. अनेक कॉलेज आणि होस्टेल कोविड सेंटर आहेत, असे राज्यांनी युक्तीवादात सांगितले आहे.