नाशिक – अत्यंत वेगाने विस्तारणाऱ्या नाशिक विमानसेवेसंदर्भात अत्यंत वाईट बातमी आहे. देशांतर्गत सेवा देणाऱ्या आघाडीच्या स्पाईस जेटने नाशिक येथील सर्व विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात अत्यंत मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच, अनेक राज्यांमध्येही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. शिवाय विमान प्रवासाआधी कोरोनाची चाचणीही सक्तीची करण्यात आली आहे. या सर्व कारणांमुळे नाशिकसह अन्य काही शहरांमधील सेवा बंद करण्याचा निर्णय स्पाईस देटने घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सद्यस्थितीत स्पाईसजेटकडून बंगळुरू आणि नवी दिल्ली या शहरांसाठीची सेवा सुरू आहे. तसेच, कंपनीकडून हैदराबाद, सूरत आणि कोलकाता या शहरांसाठीचीही सेवा प्रस्तावित आहे. मात्र, सध्या प्रवासी संख्या अत्यंत कमी असल्याने सेवा न देण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. कोरोनाचे निर्बंध हटताच पुन्हा सेवा कार्यन्वित करण्याचा कंपनीचा मानस आहे. दरम्यान, या निर्णयामुळे नाशिककरांना मोठा फटका बसणार आहे.