कॅनबेरा – ऑस्ट्रेलियामध्ये हजारो महिला असुरक्षित कार्यस्थळाच्या मुद्दयावरून रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यातील काही महिलांनी संसदच आमच्यासाठी असुरक्षित असल्याचा गंभीर दावा केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. काही पुरुष स्वतः ला राजा समजून लैंगिक अत्याचार करत असल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप महिला खासदारांनी केला आहे. कोणत्या न कोणत्या नेत्याने किंवा अधिकाऱ्याने जबरदस्तीने स्पर्श केला. तर काहींनी अपमान केला. काही महिलांनी संसद सर्वात असुरक्षित कार्यस्थळ असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकाराची जगभरात गांभिर्याने चर्चा होत आहे.
जेव्हा कधी पुरुषांच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, तेव्हा महिलांचे चारित्र्य हनन करण्यात आले. त्यामुळे त्या शांत राहिल्या. परंतु संसदेतील माजी कर्मचारी ब्रिटनी हिगिंस यांनी संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयात लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ऐकवली तेव्हा हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही संसदेतील परिस्थिती सुधारण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
संसदेत आल्यावर असे वाटले
एक नेत्या ज्युलिया बँक्स म्हणाल्या, पाच वर्षांपूर्वी संसदेत पुरुषांचे वर्तन पाहिल्यावर त्यांना ८० च्या दशकात पोहोचल्याचा भास झाला होता. संसदेचे कामकाज सुरू असतानाच अनेक पुरुषांच्या तोंडातून दारूचा वास येत असे. अनेक पुरुष नेते महिलांच्या खासगी आयुष्याबद्दल अफवा परवण्यासह चेष्टा करण्यामध्येच रमलेले असत. आजी-माजी खासदारांनी संसदेला टेस्टोस्टेरॉन (पुरुषांचे लैंगिक उत्तेजक हार्मोन) चे गोदाम म्हटले आहे. तर प्रत्येक मंत्र्यांच्या खोल्यांमध्ये फ्रिज मद्याच्या बाटल्यांनी भरलेल्या असतात, असा आरोप अनेक मुलाखतींमध्ये करण्यात आला आहे.

संताप अनावर
लेबर पार्टीच्या नेत्या तान्या लिबर्सेक म्हणतात, संसदेशी संबंधित महिलांच्या मनातील अनेक दिवसांपासून दबलेल्या रागाचा स्फोट झाला आहे. इतर संस्थांमध्ये लैंगिक समानतेवर भर दिला जात असला तरी संसदेत पुरुषांचाच दबदबा आहे. नोकरी किंवा न्याय यातून एक निवडण्याचा दबाव येत असल्यामुळे अनेक महिला पुरुषांचे नाव घेऊ शकत नाहीत.










