नवी दिल्ली – भारतीय बाजारातातील तब्बल ७७ टक्के मध हे भेसळयुक्त असून मधाच्या नावाखाली चक्क शुगर सिरपची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने (सीएसई) केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, भेसळीचे मध विक्री होणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध ब्रँडचाही समावेश आहे. या मधविक्रीत प्रचंड मोठा अन्न घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप सीएसईच्या महासंचालक सुनिता नारायण यांनी केला आहे.
सीएसईने भारतातील मध बाजारपेठेसंदर्भातील मोठा खुलासा करणारी पत्रकार परिषद घेतली. आरोग्य रक्षण आणि खासकरुन कोरोना काळात मधाची प्रचंड मागणी वाढली आहे. आणि याच काळात भेसळयुक्त मध ग्राहकांना दिले जात असल्याचे नारायण यांनी स्पष्ट केले. विशेष मेहणजे, ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्या शरीरात मधाच्या रुपाने चक्क साखर जात आहे. यामुळे लठ्ठपणासह मधुमेह आणखी बळावत असल्याचेही त्या म्हणाल्या. गुणकारी मधाचे सेवन प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करण्याचा सल्ला दिला जात आहे. असे असताना भेसळयुक्त मध ग्राहकांना मिळत आहे. हा जनतेच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नारायण यांनी केला.
बाजारात विक्री होणाऱ्या मधाच्या सीएसईने त्यांच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत विविध प्रकारच्या चाचण्या केल्या. त्यात जवळपास सर्वच प्रख्यात ब्रँडच्या मधात भेसळ असल्याचे दिसून आले, असे नारायण यांनी स्पष्ट केले. मधातील भेसळ ही अतिशय चिंतेची बाब असून सर्रास भेसळयुक्त मध अनेकांच्या आहारात असल्याचे सीएसईचे प्रकल्प संचालक अमित खुराणा म्हणाले. १ ऑगस्टपासून भारतात एनएमआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. पण, त्याचे पालन होत नसल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
प्रयोगशाळेचे निष्कर्ष असे
- तब्बल ७७ टक्के सॅम्पलमध्ये भेसळ. शुगर सिरपचा सर्रास वापर
- २२ पैकी केवळ ५ सॅम्पलच उत्तीर्ण झाले
- डाबर, पतंजली, बैद्यनाथ, झंडू, हिकृतकारी, अपिस हिमालया यासारख्या ब्रँडचे मधाचे सॅम्पल एनएमआर टेस्टमध्ये (Nuclear Magnetic Resonance Spectroscopy) अनुत्तीर्ण (failed) झाले.
- १३ पैकी केवळ ३ ब्रँडचे मध ज्यात सफोला, मार्कफेड सोहना आणि नेचर्स नेक्टर हे तपासणीत उत्तीर्ण झाले
असे आहे चीनी कनेक्शन
मधातील भेसळात खासकरुन चीनी कनेक्शन असल्याचे खुराना यांनी म्हटले आहे. चीनमधून गोल्डन सिरप, इन्वर्ट शुगर सिरप, राईस सिरप आयात केले जाते. हेच सिरप सर्रासपणे मधात वापरले जात आहे. आयात करतेवेळी या सिरपवर तसा कुठलाच उल्लेख आढळून येत नाही. मात्र, पूड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) या साऱ्या प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे नारायण यांनी म्हटले आहे.