नाशिक – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणिततज्ज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे आज पहाटे साडेसहा वाजता निधन झाले. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तशी माहिती त्यांचे पुत्र अजेय गोटखिंडीकर यांनी दिली आहे. त्यांच्या निधनाने गणित क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व लोप पावले आहे.
गोटखिंडीकर सर म्हणून ते ओळखले जात. त्यांची गणित विषयासंदर्भातील तब्बल ४०हून अधिक पुस्तके आहेत. विविध माध्यमांमध्ये ते सातत्याने लेखन करीत होते. गणिताविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ते हिरीरीने विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेत. ते पेठे शाळेचे शिक्षक होते. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडविले. अनेकांना गणिताची गोडी लावली. अतिशय रसाळ आणि सोप्या भाषेत ते गणित समजून सांगत. वैदिक गणितावरही त्यांचा गाढा अभ्यास होता. चाळीसगाव जवळील पाठमादेवी येथे होऊ घातलेल्या गणित नगरीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सरकारने दिली होती. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रीयाही करण्यात आली. त्यातच त्यांचे निधन झाले.
इंडिया दर्पणशी ऋणानुबंध
इंडिया दर्पणचा प्रारंभ १ ऑगस्टला झाला. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने मुले घरातच आहेत. ही बाब लक्षात घेऊन गोटखिंडीकर सरांनी रंजक गणित हा नवा उपक्रम इंडिया दर्पण मध्ये सुरू केला. त्यात सोमवार ते शुक्रवार गणिताची कोडी आणि त्याची उत्तरे तर शनिवारी शंकासमाधान आणि रविवारी भारतीय गणिततज्ज्ञांची ओळख करुन देणारे सदर त्यांनी लिहीले. त्यास उदंड प्रतिसाद लाभला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये होते. तरीही या सदरासाठी लेखन करु शकत नसल्याचे त्यांनी अतिशय नम्रपणे कळविले. पुन्हा सदर लिखाण करण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती. मात्र, त्यांच्या निधनाने हे सदरही आता अबोल झाले आहे.
गणित क्षेत्रातील एक अनमोल रत्न हरपले – छगन भुजबळ, पालकमंत्री
आंतरराष्ट्रीय गणिततज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे दुःखद निधन झाले. नाशिकच्या पेठे विद्यालयात नोकरी करत असतांना त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. गणित विषयातील तज्ञ गोटखिंडीकर यांनी भास्कराचार्य गणित नगरी उभारणीमध्ये महत्वाची जबाबदारी पार पडली. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. आजवर त्यांची ७३ पुस्तके देखील प्रकाशित झाली आहे. त्यांच्या निधनाने गणित क्षेत्रातील एक अनमोल रत्न हरपले आहे. मी व माझे कुटुंबीय गोटखिंडीकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून राज्य शासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे भुजबळ यांनी सांगितले.