नाशिक – शहरात ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. द्वारका परिसरातील सुविचार या खासगी हॉस्पिटल मधील ऑक्सिजन संपला आहे. येथे एकूण ३० रुग्ण ऑक्सिजनवर असून त्यातील ६ जण अत्यवस्थ आहेत. ऑक्सिजन नसल्याने या रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात यावे, असे हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांच्या कुटुंबियांना सांगितले आहे. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. मागणी करुनही ऑक्सिजन मिळत नसल्याने हॉस्पिटल प्रशासनाने हतबलता व्यक्त केली आहे. दरम्यान, येथील ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र, अन्य खासगी हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने या रुग्णांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, या गंभीर प्रश्नाची माहिती महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारी, महापौर आदींना देण्यात आली आहे. त्यामुळए काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.