अलिराजपूर (मध्य प्रदेश) – एका गावात मानव समाजाला लाजिरवाणी ठरणारी घटना उघडकीस आली आहे. रविवारी एका १६ वर्षीय मुलीवर एका युवकाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबियांनी ती पिडीत मुलगी व आरोपी या दोघांना दोरी बांधून गावात मिरवणूक काढली. इतकेच नाही तर या परिवाराने या मिरवणुकीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरही टाकला.
मध्य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यापासून सुमारे २२ किमी अंतरावर असलेल्या एका गावात ही घटना घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणि दुसरा पीडितेच्या कुटूंबाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपीसह सहा जणांना अटक केली.
विशेष म्हणजे, आरोपीचे लग्न झाले असल्याचे सांगितले जाते आणि त्याला दोन मुले आहेत. चौकशीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसर्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ राज्यभरात व्हायरल होत आहे.