इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारनं देशात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीन आणि रशियावरून आयात केलेल्या लसीची किंमत निश्चित केली आहे. खासगी कंपनीतर्फे आयात केलेल्या या लसींसाठी सरकारनं रशियाच्या स्पूटनिक लशीची किंमत ८,४४९ रुपये आणि चीनच्या कनविडेसिया लसीची किंमत प्रतिडोस ४,२२५ रुपये इतकी निश्चित केली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या १२.३९ कोटींवर पोहोचली आहे. मृतांचा आकडा २७.२९ लाखांवर पोहोचला आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांना चिनी लसीचा डोस घेतल्यानंतरसुद्धा कोरोनाची लागण झाली होती. तरीही रशिया आणि चीनवरून आयात केलेल्या लसीची किंमत निश्चित करण्यासाठी ड्रग रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ पाकिस्तानच्या औषध मूल्य समितीनं शिफारस केली होती. जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेनं पाकिस्तानला १५.३ कोटी डॉलरचं कर्ज दिलं आहे.
ब्रिटनकडून इशारा
ब्रिटननं आपल्या नागरिकांना दुसऱ्या देशांमध्ये सुट्या घालवण्याविरोधात इशारा दिला आहे. संरक्षणमंत्री बेन वालेस म्हणाले, की शेजारील युरोपीय देशांमध्ये संसर्ग वाढल्यानं लसीकरणावर पाणी फिरू शकतं. दुसर्या देशात पर्यटन दौर्यांवर नियंत्रण ठेवलं गेलं नाही, तर प्रवाशांच्या माध्यमातून घातक विषाणूचा प्रसार वेगानं होण्याची शक्यता आहे. देशाबाहेर जे काही चाललं आहे, त्यावर आम्ही डोळे आणि कान बंद ठेवू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.