दिंडोरी – गेल्या द्राक्ष हंगामात व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे अचानक शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होत आहेत. निमित्त आहे ते विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांचे. शेतकऱ्यांच्या पैशांची अडवणूक करणाऱ्यांना दिघावकर यांनी इशारा देताच व्यापाऱ्यांनी पैसे परत करण्यास प्रारंभ केला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून वेळोवेळी पैशांची मागणी केली असता उडवाउडवीचे उत्तरे मिळत होती. याप्रकरणी द्राक्ष उत्पादकांनी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांनो, शेतकऱ्यांना फसवाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा दिघावकर यांनी दिला. तालुक्यातील खडक सुकेणे येथील शेतकरी पंढरीनाथ प्रभाकर ढोकरे यांनी यासंबंधीची माहिती आणि बातमी लुधियाना येथील व्यापारास पाठवले. याप्रकरणी आम्ही शेतकरी वर्ग दिघावकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे व्यापाऱ्यास सांगितले. त्याची तत्काळ दखल घेत व्यापाऱ्याने अवघ्या १५ मिनिटांमध्येच दीड लाख रुपये ढोकरे यांच्या बँक खात्यात जमा केले.
संबंधित शेतकऱ्यासह खडक सुकेणे येथील विलास कळमकर, अमोल गणोरे, नारायण पालखेडे, केशव ढोकरे, मधुकर फुगट, नारायण गणोरे, मनोज गणोरे, भाऊसाहेब पालखेडे, प्रशांत गणोरे यांनी दिघावकर यांची भेट घेतली. सर्व वृत्तांत त्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले.
दरम्यान, या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.