धनबाद (झारखंड) – बालविवाहाला आता समाजात स्थान नसलं तरी अनेक ठिकाणी खेड्यापाड्यात बालविवाह होतात. पण जर दोन लहान मुलींनीच एकमेकींशी विवाह केला तर…होय सरायढेला पोलिस ठाणे क्षेत्रातल्या सुगियाडीह इथं दोन अल्पवयीन मैत्रिणींनी लग्न केल्याची घटना उघड झाली आहे.
दोघींपैकी एकीचं वय १४ तर, दुसरीचं वय फक्त १३ वर्ष आहे. १३ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी रविवारी जेव्हा तिला वधूच्या रूपात पाहिलं तेव्हा ते स्तब्धच झाले. तिनं गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं आणि भांगेत कुंकू लावलं होतं. चौकशी केल्यानंतर तिनं जवळच राहात असलेल्या १४ वर्षीय मैत्रिणीशी विवाह केल्याचं सांगितलं. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या दोघींना रविवारी ११ वाजता सरायढेला पोलिस ठाण्यात नेलं. दोन्ही मैत्रिणींनी लग्न केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं. तेव्हा पोलिसही स्तब्ध झाले.
एक मुलगी मुलाच्या रूपात
वर झालेली म्हणजेच मुलगा झालेली १४ वर्षीय मुलीनं मुलाचे रूप धारण केलं होतं. तिनं मुलासारखे केस कापले होते. तसंच मुलासारखेच कपडेही परिधान केले होते. तर दुसरी मुलगी मंगळसूत्र आणि कुंकू लावलेली होती. पोलिसांनी दोन्ही मुलींना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोघीही ऐकायला तयार होत नव्हत्या. दोघींनीही सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्याचं सांगू लागल्या. पोलिसांचं म्हणनं ऐकत नसल्यानं त्या दोघींसह त्यांच्या कुटुंबीयांना महिला पोलिसांच्या ठाण्यात पाठवण्यात आलं. महिला पोलिसांनीही दोघींना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दोघी ठाम होत्या. लहानपणापासून एकमेकींवर प्रेम करत असल्याचं दोघींचं म्हणनं होतं. काही दिवसांपूर्वी दोघींनी घरातून पळून जाऊन एका मंदिरात लग्न केलं होतं आणि जवळच एका झोपडीत राहिल्या होत्या. दोघींनी आपल्या मित्राकडे मदत मागितली परंतु त्यानं नकार दिला होता, असं मुलींनी सांगितलं.
पोलिसांनी काढला तोडगा
मुलगा झालेली मुलगी पोलिस ठाण्यात सर्व प्रश्नांची उत्तरं देत होती. आपल्या पत्नीला घरी घेऊन जाईन आणि आम्ही दोघी सोबत राहू, असं ती सांगत होती. दोघीही ठाम होत्या, त्यामुळे पोलिसांनी एक तोडगा काढला. दोघीही अल्पवयीन आहेत. कायदेशीररित्या सोबत राहू शकत नाहीत. वयात आल्यानंतर दोघींना सोबत राहण्याची परवानगी दिली जाईल. हा तोडगा दोघींनीही मान्य केला. यादरम्यान पालकांनी कोणतीही जबरदस्ती केली तर वधूला सोबत घेऊन येईन, असं मुलगा झालेल्या मुलीनं स्पष्ट केलं. खूप प्रयत्न केल्यानंतर दोघीही तयार झाल्या. महिला पोलिसांनी त्यांना पालकांसोबत घरी पाठवलं. पण दोघींचेही पालक हतबल असून, कोणत्याही परिस्थितीत या नात्याला मान्यता देण्यास तयारी नाहीत.