नवी दिल्ली : नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज, डॉक्युमेंट्रीज वेगवेगळ्या विषयांमुळे लोकांना नेहमीच भावतात. नेटफ्लिक्सवरील हे सगळं भांडार लवकरच प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे. ५ आणि ६ डिसेंबरला भारतात नेटफ्लिक्स स्ट्रीमफेस्ट आयोजित करण्यात येणार आहे. हे दोन दिवस आपण आपल्याला जे हवं ते फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकतो. ज्यांच्याकडे नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन नाही त्यांनाही या निमित्ताने अनेक कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. आपली ग्राहक संख्या वाढवणे तसंच इतर ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत स्पर्धा करणे या उद्देशाने नेटफ्लिक्सने हा फेस्टिव्हल आयोजित करण्याचे ठरवले आहे. या फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना केवळ आपले नाव, ई-मेल आयडी टाकून पासवर्ड क्रिएट करायचा आहे. जगभरातील दर्जेदार साहित्य भारतीय प्रेक्षकांपर्यंत आणायचे असल्याने आम्ही हा स्ट्रीमफेस्ट आयोजित करत असल्याचे नेटफ्लिक्स इंडियाच्या उपाध्यक्ष (कंटेंट) मोनिका शेरगील यांनी म्हटले आहे.