अहमदनगर – दोन कुटुंबातील भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करायची म्हणून त्याने लाच मागितली. मात्र, त्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) मिळाली आणि तो लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेला. अकोले पोलिस स्टेशनचा हवालदार संतोष पुंजा वाघ याला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका विवाहितेचा तिच्या सासरच्यांकडून छळ होत होता. यासंदर्भातील तक्रार अकोले पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. दोन्ही कुटुंबात तडजोड करुन देण्याच्या मोबदल्यात वाघ याने १० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची माहिती एसीबीला देण्यात आली. एसीबीने रचलेल्या सापळ्यात वाघ हा रंगेहाथ पकडण्यात आला.
दरम्यान, लाच देणे किंवा घेणे गुन्हा असून याप्रकरणी तक्रारीसाठी १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.