मुंबई – बजेट मांडताना सुरुवातीलाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० पूर्णपणे तयार असल्याची घोषणा केली. यात सर्व रेल्वे वीजेवर चालणार आहेत. त्यासाठी १.१० लाख कोटी रुपयांचे बजेट केंद्र सरकारकडून रेल्वेला देण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेसोबतच सार्वजनिक परिवहन सेवेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मेट्रो आणि बससेवा वाढविण्याचाही सरकारचा मानस दिसला. त्यासाठी १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, नागपूर या शहरांसह कोच्ची, बंगळुरू, चेन्नई या शहरांमध्येही मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येणार आहे, असे सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले.
महामार्गांचे जाळे विस्तारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तामिळनाडू राष्ट्रीय महामार्गासाठी १.०३ लाख कोटी रुपयांची घोषणा त्यांनी केली. यात इकॉनॉमिक कॉरिडोअर तयार होणार आहे. केरळमध्ये ६५ हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग उभारले जाणार आहेत. मुंबई ते कन्याकुमार इकॉनॉमिक कॉरिडोअरची घोषणा यावेळी झाली. आसाममध्ये पुढील ३ वर्षांमध्ये महामार्ग आणि इकॉनॉमिक कॉरिडोअर तयार करण्यात येतील, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.