नाशिक – देशात पहिल्यांदाच राज्य शालेय शिक्षण विभागाने चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम दीक्षा अॅपवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. याअंतर्गत कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांमध्ये बदल घडविण्यासाठी अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित माहितीपर व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यांच्या सहकार्याने हा माहितीपर व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहे. कचरा व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी संबंधित विषयाचा माहितीपर व्हिडीओ प्रसारित करण्यात आला असून, प्लास्टो, राणी आणि राज अशा तीन भूमिकांमधून ही माहिती दिली जात आहे. यासाठी झिंटेओ संस्थेशी करार करण्यात आला आहे.
नाशिक व कोल्हापूर येथील १५५० शाळांमधील जवळपास ८० हजार विद्यार्थ्यांना याबाबत शिक्षण दिले जात आहे. बोलक्या चित्रांद्वारे कचरा व्यवस्थापनाची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे झिंटेओ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुभाषिनी चंद्र यांनी म्हटले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल जाणवत असल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबईतील ११८७ शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उन्हाळी शिबिराच्या पुढाकाराने समावेश, एका महिन्यात या अभ्यासक्रमाला ८३,९०० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच रहदारी सुरक्षेच्या नियमासंदर्भात अभ्यासक्रम सुरु करण्याच्या प्रयत्नात असल्याचे शिक्षण परिषदेचे अधिकारी विकास गरड यांनी सांगितले आहे.