नवी दिल्ली – विविध भारतीय संस्था आणि विद्यापीठांमधील संशोधनविषयक सुविधांच्या सहाय्याने संशोधनाचे कार्य करण्यासाठी या वर्षी सहा देशांमधील ४० अभ्यासकांना भारतीय विज्ञान संशोधन शिष्यवृत्ती (ISRF) २०२१ प्रदान करण्यात आली आहे. या अभ्यासकांचे संशोधनविषयक प्रस्ताव, त्यांच्या क्षेत्रातील अनुभव, शैषणिक गुणवत्ता आणि त्यांच्या अभ्यासाविषयी प्रकाशित ग्रंथसंपदा यांच्या निकषावर या अभ्यासकांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.
शेजारी देशांशी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य संबंध प्रस्थापित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या देशांमधील संशोधकांना भारतीय संस्था आणि विद्यापीठांमध्ये संशोधनविषयक कार्य करण्यासाठी आमंत्रित करण्याच्या उद्देशाने या शिष्यवृत्तीची सुरुवात करण्यात आली आहे.
हा उपक्रम २०१५ पासून सुरु करण्यात आला आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत या देशांमधील १२८ अभ्यासकांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठीच्या आज्ञावली पैकी एक असलेले शेजारी देशांशी संशोधनविषयक सहकार्य स्थापित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती हा एक उत्तम मंच ठरला आहे.