नवी दिल्ली – संपूर्ण जगात कोरेनावरील लसीचे संशोधन युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी तीन प्रकल्पांना भेट देऊन तेथील सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यात या तिन्ही लसींची सद्यस्थिती समोर आली आहे.
जायकोव डी – झायडस कॅडिला – अहमदाबाद
अहमदाबादमधील बायोटेक पार्कमध्ये झायडस कॅडिलाचा औषध निर्मिती प्रकल्प आहे. या ठिकाणी जायको वी-डी या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात आहे. सध्या तिच्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. दुसरा टप्पा ऑगस्टमध्येच सुरू झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीकडे सध्या ही लस आहे. ही लस आतापर्यंत ८० टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या लसीसाठी जाडसने विराक, नेशनल बायोफार्मा मिशन आणि केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागासोबत करार केला आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कोवावॅक्सिन – भारत बायोटेक – हैदराबाद
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक येथे लस निर्मिती सुरु आहे. हैदराबाद पासून ५० किलोमीटर दूरवरील कंपनीच्या प्रयोगशाळेत २६ हजार स्वयंसेवकांच्या सहयोगाने सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. या लसीला भारत बायोटेकच्या बीएसएल ३ या मशीनमध्ये बनविले जात आहे. ही स्वदेशी बनावटीची कोरोना लस आहे. आतापर्यंतचा टप्पा हा पूर्णपणे यशस्वी आहे. ही लसही पुढील वर्षाच्या प्रारंभी येण्याची चिन्हे आहेत.
कोविशिल्ड – सिरम इन्स्टिट्यूट – पुणे
सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड या लसीच्या निर्मितीसाठी एस्ट्राजेनेका आणि ब्रिटनची ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्याशी करार केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला मान्यता दिली आहे. या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. येथे निर्माण होणाऱ्या निम्म्या लस या भारतात वितरीत केल्या जाणार आहेत. तर, उर्वरीत अन्य देशांना दिल्या जाणार आहेत.