नवी दिल्ली ः कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेने दिल्लीसह संपूर्ण देशात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण अभियान वेगाने करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे सध्या लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेत नुकत्यात झालेल्या एका संशोधनात निष्पन्न झाले आहे की, मास्क वापरामुळे कोरोना संसर्गग्रस्त भागात संसर्गाचा दर वेगाने खाली घसरला आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मास्क सक्षम पर्याय आहे. मास्कच्या वापरामुळे संसर्गासह मृत्यूदरसुद्धा कमी झालेला आहे, असा दावा एम्सचे माजी संचालक डॉ. एम. सी. मिश्र यांनी वरील संशोधनाच्या आधारावर केला आहे.
डॉ. मिश्र म्हणाले, हे संशोधन जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये (जामा) प्रकाशित झाले आहे. मास्क घालून वावरणा-या दोन व्यक्तींमधील अंतर सहा फुटापेक्षा कमी असले तरीही संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. खोकल्यातून किंवा शिंकल्यानंतर तोंडावाटे निघणार्या विषाणूंना मास्कद्वारे रोखता येऊ शकते, असे यापूर्वीच सांगण्यात आले आहे.
देशातील आतापर्यंत सात कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. यातील दोन डोस खूपच कमी लोकांना देण्यात आले आहेत. जुलै-ऑगस्टपर्यंत मोठ्या लोकसंख्येला लस लावली गेल्यास संसर्ग रोखण्यास मदत होऊ शकणार आहे. देशातील १०० लोकांपैकी फक्त ५ जणांनाच लस देण्यात आलेली आहे. जोपर्यंत बहुतांश लोकांचे लसीकरण होणार नाही, तोपर्यंत सामुहिक रोगप्रतिकारकशक्ती तयार होणार नाही, असे एम्सचे कम्युनिटी मेडिसीनचे प्रा. डॉ. संजय राय यांनी सांगितले.