सोली सोराबजी यांनी मानवाधिकार आणि विधी व न्याय क्षेत्रात केलेले कार्य भारत विसरू शकणार नाही – छगन भुजबळ
मुंबई -देशाचे माजी महाधिवक्ता, प्रख्यात कायदेपंडित पद्म विभूषण सोली सोराबजी यांच्या निधनाबद्दल राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त केले असुन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे..
मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की मानवाधिकारासाठी लढणारे एक जागरुक व्यक्तिमत्व म्हणून सोली सोराबजी यांचे कायम स्मरण राहील. १९५३ पासुन जवळपास ७० वर्ष त्यांनी वकिली क्षेत्रात मोठं योगदान दिले आहे. आपल्या या सात दशकांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी नेहमीच मुलभूत अधिकार, न्यायिक मुल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. याचमुळे मार्च २००२ मध्ये त्यांना मानवाधिकारांचं संरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू मांडण्यासाठी ‘पद्म विभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
सोली सोराबजी यांनी विधी व न्याय आणि मानवाधिकार क्षेत्रात केलेले कार्य भारत कधीही विसरू शकणार नाही असे मत व्यक्त करतानाच भुजबळ यांनी सोली सोराबजी यांच्या कुटुंबीयांचा दुःखात मी व माझे संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याची भावना देखील व्यक्त केली आहे……